'जय जांबमुनी' म्हणत एकत्रीत आले; डीजेवर तालावर मिरवणूक काढली
By काशिनाथ वाघमारे | Published: December 22, 2023 06:44 PM2023-12-22T18:44:42+5:302023-12-22T18:45:25+5:30
प्रथमत: आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते जांबमुनी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयघोष करण्यात आला.
सोलापूर : फुलांनी सजलेली बग्गी..लक्ष वेधून घेणारी जांबमुनी महाराजांची पंचधातुची मूर्ती..फेटे बांधलेल्या पुरुष-महिला कार्यकर्ते..जय जांबमुनी म्हणत सारे एकत्रित येत डीजेच्या तलावर थिरकत मिरवणूक काढली. चौका-चौकात या मिरवणुकीचे स्वागत झाले.
मोची समाजाचे दैवत आदी जांबमुनी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात मध्यवर्ती लष्कर मंडळासह ३२ मंडळांनी शुक्रवारी दुपारी १ वाजता रेल्वे स्टेशन परिसरात महात्मा गांधी पुतळा येथून ही मिरवणुक काढली. या मिरवणुकीत मोदीपरिसरातील ८ मंडळं, लष्कर परिसरातील १५ मंडळं, फॉरेस्ट परिसरतील २ आणि निराळेवस्ती, उपलपवस्ती, पाच्छापेठ, मोदी, कुमठा नाका परसरातून जवळपास ३२ मंडळांनी सहभाग नोंदवला.
प्रथमत: आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते जांबमुनी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयघोष करण्यात आला. यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार नरसय्या आडम, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत, प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, सरस्वती कासलोलकर, माेची समाजाचे शहर व जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे, युवक अध्यक्ष रविकांत कमलापुरे, माजी महापौर संजय हेमगड्डी, रथोत्सव अध्यक्ष रविंद्र आसादे, नागनाथ कोसलोलू, सिद्राम कामाटी, बसवराज म्हेत्रे, नरसिंह आसादे, हणमंतु सायबोळू, नरगसेविका वैष्णवी करगुळे, माजी नगरसेविका मिनाक्षी कंपली, आशा म्हेत्रे, शुभांगी लिंगराज, श्रीनिवास म्हेत्रे यांच्यासह असंख्य समाजबांधवांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला.
दहा मंडळांचे देखावे...
या मिरवणुकीत जवळपास दहा मंडळांनी देखावे सादर केले होते. या मिरवणुकीत कोनापुरे चाळीतील बाबा ग्रुपच्या वतीने अमरनाथ गुफा कंटेनरवर साकारली. फिरत्या देखाव्यात चौका-चौकात थांबून भगवान शंकर आणि बर्फातील लिंग यांचे दर्शन सर्वसामान्यांनी घेतले. लष्करमधील काही मंडळांनी रामायण आणि महाभारतातील संदर्भांवर देखावे सादर केले.