रिंगण सोहळ्यांनी वारकऱ्यांमध्ये चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 02:32 AM2018-07-22T02:32:43+5:302018-07-22T02:33:10+5:30
पालखी सोहळा वाखरीत; विठ्ठल-रुक्माईचा जयजयकार
गोपालकृष्ण मांडवकर/शहाजी फुरडे-पाटील
वाखरी (जि. सोलापूर) : विठुरायाची ओढ लागलेल्या वारकºयांनी शनिवारी माऊली आणि तुकोबांच्या पालखीत रिंगणाचा सोहळा अनुभवला. विठ्ठल-रुक्माईच्या जयघोषात वारकºयांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते.
पालखी सोहळे वाखरीकडे येत असताना दुपारी ३ वाजता सोपनकाकांच्या पालखीचे आगमन झाले. या सोहळ्यातील अश्वानी एक रिंगण पूर्ण केले. त्यानंतर त्याच ठिकाणी व माऊलींचेही उभे रिंगण पार पडले. माऊलींचे गोल रिंगण झाल्यानंतर शेवटी तुकोबांचे उभे रिंगण झाले. हे रिंगण सोहळे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
नेहमीप्रमाणे सकाळी लवकर प्रस्थान नसल्याने जादा विश्रांती घेऊन पिराची कुरोली येथे मुक्कामासाठी थांबलेला संत तुकारामांचा पालखी सोहळा दुपारी वाखरीकडे वाटचाल करू लागला. वाटेत बाजीराव विहीर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या शेवटच्या उभ्या रिंगणाचा आनंद मनात साठवून अन् संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे गोल रिंगण पाहून संत तुकोबारायांचा पालखी सोहळा वारीतील शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरीत सर्व
संत-महंतांच्या बरोबरीने विसावला.
रथाबरोबर मध्ये उभे असलेले वारकरी विठुनामाचा गजर करीत तल्लीन होऊन नाचत होते आणि अश्व कधी एकदाचा येतोय, याचीच वाट पाहत होते. काही वेळाने दोन्ही अश्व दाखल झाले. दोन्ही अश्वांनी एक फेरी पूर्ण करून रिंगण पूर्ण केले. अश्वांचे रिंगण पूर्ण होताच दिंड्यादिंड्यांमध्ये फुगडीचा खेळही चांगलाच रंगला.
बाजीराव विहिरीजवळ ६ लाखांची गर्दी
बाजीराव विहीर येथील हे रिंगण सोहळे शेवटचे असल्याने जिल्ह्यातील लाखो भाविक रिंगण पाहण्यासाठी जमले होते. तुकोबांच्या उभ्या रिंगणाबरोबर माऊलींचे सुरुवातीला उभे व नंतर गोल रिंगण पार पडले. यावेळी वारकºयांचा माऊली-तुकाराम असा गजर सुरूच होता. तसेच प्रत्येक दिंडीमध्ये हरिपाठाचे गायन सुरू होते. पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या विविध संतांचे सोहळे एकामागून एक बाजीराव विहीर चौकात येत होते. त्यामुळे याठिकाणी सुमारे सहा लाखांची गर्दी झाली होती.