सोलापुरातील गुदमरलेले चौक; दत्त चौकातील कोपरा न् कोपरा व्यापलाय..पार्किंग केलेली वाहने अन् फेरीवाल्यांनी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:43 AM2019-01-30T11:43:45+5:302019-01-30T11:47:33+5:30
संताजी शिंदे सोलापूर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दत्त चौकात एकेरी मार्गाचा नियम असताना तो धाब्यावर बसवला जात असल्याचे ...
संताजी शिंदे
सोलापूर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दत्त चौकात एकेरी मार्गाचा नियम असताना तो धाब्यावर बसवला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते. रस्त्याच्या कडेला झालेले अतिक्रमण, परवाना नसलेल्या जागेत रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या रिक्षा स्टॉपमुळे वाहतुकीची कोंडी होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अस्ताव्यस्त पार्किंग केलेली वाहने अन् फेरीवाल्यांनी चौकातील प्रत्येक कोपरा न् कोपरा व्यापून गेलेला आहे.
शहरातील प्रमुख चौकांपैकी एक असलेला दत्त चौक हा नेहमी गजबजलेला असतो. सकाळी ९ पासून या चौकातून जाणाºया- येणाºया लोकांची गर्दी असते. नवी पेठ, राजवाडे चौक आणि दक्षिण कसबा येथून वाहने मोठ्या प्रमाणात येतात. या रस्त्यावरून येणारी वाहने सळई मारूती मंदिर, श्री दत्त मंदिर, लक्ष्मी मार्केट, गणपती घाटाकडे जात असतात. याच मार्गावरून राजवाडे चौक, नवी पेठ, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या दिशेने वाहने जातात.
वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून दत्त चौकात एकेरी मार्ग देण्यात आला आहे. लक्ष्मी मार्केटकडून येणारी वाहतूक ही सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दिशेने अथवा दर्गाहच्या कॉर्नरवरून नवी पेठ, राजवाडे चौकाकडे वळवण्यात आली आहे. दत्त मंदिराकडे जायचे असेल तर याच मार्गाने वळसा घालून जावे लागते. सळई मारूती मंदिराकडून येणारी वाहतूक ही दत्त मंदिर मार्गे वळसा घालून जाणे आवश्यक आहे.
एकेरी मार्ग असलेल्या या चौकात सर्रास चुकीच्या दिशेने वाहतूक होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. चौकात वाहतूक शाखेच्या वतीने एकेरी मार्गाचा बोर्ड लावण्यात आला आहे, मात्र तो वाहन चालकांच्या लक्षात येत नाही. गणपती घाट येथे सरस्वती कन्या प्रशाला व विद्या विकास प्रशाला असल्याने सकाळी ११.३0 व सायंकाळी ५.३0 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी याच चौकातून मोठ्या संख्येने जातात. चौकात फळे विक्री करणाºया विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला चारचाकी गाड्या लावल्या आहेत. व्यापाºयांच्या दुकानांसमोर दुचाकी वाहन पार्किंग आणि फळ विक्रेत्यांच्या गाड्या यामुळे रस्ता मोठा असला तरी तो लहान होत आहे. रामदास संकुलात विविध दुकाने आहेत. वरच्या मजल्यावर हॉस्पिटल आहे़ त्यामुळे वाहने समोर पार्किंग केली जातात. पार्किंगच्या बाजूला रस्त्याच्या मध्यभागी विनापरवाना रिक्षा स्टॉप आहे, त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.
दत्त चौकाकडे जाण्यासाठी दहा रस्त्यांचा वापर...
- - दत्त चौकाकडे जाण्यासाठी राजवाडे चौक, नवी पेठ, दक्षिण कसबा, टोळाचा बोळ, सळई मारूती मंदिर, दत्त मंदिरासमोरील शनि मंदिर, लक्ष्मी मार्केट, गणपती घाट, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आर्यनंदी पतसंस्थेकडून येणारा मार्ग अशा एकूण १0 मार्गावरून दत्त चौकाकडे जाता येते. दहा दिशेकडून होणारी वाहतूक लक्षात घेता दत्त चौकात एकेरी मार्ग करण्यात आला आहे.
- - सळई मारूती मंदिराकडून माणिक चौकाकडे जाणारा मार्ग अत्यंत लहान असल्याने कायम वाहतुकीची कोंडी असते. याच मार्गावर विविध हॉस्पिटल असल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न या रस्त्यावर आहे. एखादी चारचाकी गाडी उभी राहिली की तासन्तास वाहतुकीची कोंडी होत असते. शहरातील मध्यवर्ती भागातील सर्वात मोठा प्रश्न आहे.
दत्त चौकात एकेरी मार्ग आहे, मात्र वाहन चालकांच्या लक्षात येत नाही. वाहने कशीही कोठूनही येतात आणि वाहतुकीची कोंडी होते. रस्त्यावर अतिक्रमणही होत आहे. एकेरी मार्गाचा बोर्ड दिसेल अशा पद्धतीने लावून या ठिकाणी एक वाहतूक शाखेचा पोलीस नेमण्याची गरज आहे.
-सुनील वाघमोडे, स्थानिक दुकानदार
टोळाच्या बोळातून येणाºया वाहनांची संख्या मोठी आहे, तेथे स्पीड ब्रेकर बसविणे गरजेचे आहे. बोळातून येणारी वाहने व नवी पेठ, राजवाडे चौकाकडून सळई मारूती मंदिराच्या दिशेने जाणारी वाहने ही वेगात असतात. त्यामुळे वारंवार अपघात होत असतात. रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली पाहिजेत.
-सूरज जाधव, स्थानिक दुकानदार
सळई मारूती मंदिराच्या दिशेने जाणाºया वाहनांना मोठी कसरत करावी लागते़ पार्किंगची योग्य सोय झाली पाहिजे. दत्त चौकातील एकेरी मार्गाचे तंतोतंत पालन केल्यास वाहतुकीची समस्या सुटेल.
-मोहित आहुजा, स्थानिक व्यापारी