एलईडीने उजळला सोलापुरातील छत्रपती शिवाजी चौक परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:58 AM2018-12-15T11:58:14+5:302018-12-15T12:01:40+5:30
कामाला सुरुवात : पहिल्या दिवशी बसविले ४० दिवे; छत्रपती संभाजी चौकापर्यंत शुभ्र प्रकाश
सोलापूर : शहरातील छत्रपती संभाजी चौक ते छत्रपती शिवाजी चौक रस्ता एलईडी दिव्यांच्या प्रकाशाने उजळला आहे. पुढील आठवडाभरात शिवाजी चौक ते सात रस्ता परिसरातील रस्तेही उजळून निघणार आहेत.
महापालिका आणि ईईएसएल कंपनीच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांवर एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ईईएसएल कंपनीने यासाठी बेसलाईन सर्व्हे सुरू केला आहे. ज्या भागात सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्या भागातील पथदिव्यांवर एलईडी दिवे बसविण्यात येत आहे. ईईएसएल कंपनीच्या कर्मचाºयांनी बुधवारी संभाजी चौक ते शिवाजी चौक या रस्त्यावरील पथदिव्यांवर नोंदी केल्या होत्या. शुक्रवारी येथील पथदिव्यांवर ११० वॅटचे ४० एलईडी दिवे बसविण्यात आल्याची माहिती ईईएसएल कंपनीचे इंजिनियर सुशांत साळुंखे यांनी दिली. शनिवारपासून शिवाजी चौक ते सात रस्ता या मुख्य रस्त्यावरील पथदिव्यांचे सर्वेक्षण सुरू होईल. पहिल्या दिवशी कामगार आणि क्रेनची कमतरता होती. उद्यापासून यंत्रणेत भर पडेल. त्यामुळे कामाला वेग येईल, असा दावाही साळुंखे यांनी केला.
ईईएसएल कंपनीने जानेवारी अखेर संपूर्ण शहरातील काम पूर्ण करण्याची तयारी केली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या वीज बिलात नेमकी किती बचत होईल, याचा खुलासा होणार असल्याचे विद्युत विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे. एलईडीचे काम होणार असल्याने महापालिकेने शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती बंद केली होती. त्यामुळे अनेक भागात अंधार होता. जानेवारीपर्यंत हा अंधार दूर होईल, असा दावा मनपा प्रशासन करीत आहे.