रुग्णालयात लावा उपचाराचे दर, नाहीतर होऊ शकतो परवाना रद्द; जिल्हा शल्य चिकित्सकांचा आदेश
By शीतलकुमार कांबळे | Published: May 18, 2023 01:52 PM2023-05-18T13:52:06+5:302023-05-18T13:52:32+5:30
खासगी रुग्णालयात आता रुग्ण हक्क कायद्यानुसार उपचार व रुग्णसेवाचा दर यांची माहिती होणार आहे. ही माहिती रुग्णांना मिळावी यासाठी केंद्र सरकारने आदेश काढला होता पण अंमलबजावणी होत नव्हती.
सोलापूर - बऱ्याच वेळा रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपचाराचे अधिक बील घेतल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. यावर प्रतिबंध म्हणून आता सर्वच खासगी रुग्णालयांना त्यांच्या आवारात उपचार व सेवेचे दर लावावे लागणार आहेत. याची अंमलबजावणी न केल्यास त्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा परिपत्रक जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून काढण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हयातील प्रत्येक खाजगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शणी भागात लावणे कायद्याने बंधनकार आहे. परंतु, जिल्हयातील बहुतांश रुग्णालयामध्ये रुग्णांच्या हक्काची सनद दर्शनी भागात लावलेली निदर्शनास येत नाही, अशी तक्रार मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे महाराष्ट्र सचिव मनिष देशपांडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली होती.
खासगी रुग्णालयात आता रुग्ण हक्क कायद्यानुसार उपचार व रुग्णसेवाचा दर यांची माहिती होणार आहे. ही माहिती रुग्णांना मिळावी यासाठी केंद्र सरकारने आदेश काढला होता पण अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे रविंद्र देशपांडे यांनी १२ मे रोजी शंभरकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार प्रशासनाने माहिती देण्यासंदर्भात आदेश दिले.
इथे करा तक्रार
उपचाराचे दरपत्रक पाहता न आल्यास तसेच रुग्णालय बदलताना रुग्णालय प्रशासनाकडून त्रास होत असल्यास तक्रार करता येते. रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, आणि ग्रामीण रुग्णालय येथे तक्रार करु शकतात.