जेलमधून सुटलेल्या आरोपीने पुन्हा केली चोरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 04:20 PM2019-06-15T16:20:04+5:302019-06-15T16:21:34+5:30
चोवीस तासांत सात लाखांचा मुद्देमाल पकडला : शहर पोलीसांनी केली चौघांना अटक
सोलापूर: पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या अट्टल चोरट्यांनी कारागृहातून सुटताच पुन्हा गुन्हा करीत घोंगडे वस्तीमध्ये घरफोडी करुन तब्बल ६५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. पोलिसांनी २४ तासांत या गुन्ह्याचा तपास करुन तब्बल ७ लाख ७४ हजार ७४० रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणातील चौघांना अटक करण्यात आली आहे. अन्य एक जण फरार आहे.
घोंगडे वस्तीतील टॉवेलचे कारखानदार श्रीनिवास नारायण यलगुंडी हे त्यांच्या भावाच्या मुलीच्या लग्नासाठी सूरत येथे गेले होते. याच दरम्यान, १० जून रोजी चोरट्यांनी संधी साधून ६५ तोळे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या घरफोडीच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आदेश दिले होते. त्यानुसार घरफोडी झालेल्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने शोध घेणे सुरु केले. गुप्त बातमीदारांमार्फत ही चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष संजय कांबळे याने केल्याचे सांगितले.
या माहितीच्या आधारे पथकाने संतोष संजय कांबळे (वय २९, रा. जयमल्हार चौक, आडवा नळ सोलापूर) याच्यासोबत यल्लालिंग उर्फ यल्लप्पा ईरण्णा पुजारी (वय २९, रा. १०२ ई, ३४/३५, घोंगडे वस्ती सोलापूर) यांना ११ जून रोजी ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पाच जणांनी मिळून घरफोडी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना अटक केली. चोरीतील त्यांच्या वाटणीस आलेले २१७ ग्रॅम (९.७ तोळे)े सोन्याचे दागिने ज्याची किंमत ४ लाख ३४ हजार ते आणि ९४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा ४ लाख ४० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला. अटक केलेल्या आरोपींपैकी संतोष संजय कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याने यापूर्वी चाटला साडी सेंटर हे दुकान फोडून चोरी केली होती.
अटक केलेल्या आरोपींकडून ३ आरोपींची नावे निष्पन्न झाली होती. यातील तिसरा आरोपी राम राजू निंबाळकर उर्फ पाप्या (वय ३०, रा. सुनीलनगर, एमआयडीसी सोलापूर) आणि चौथा किशोर ज्ञानेश्वर फुलपगार (वय २०, रा. १०२/ जी घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) यांना १३ जून रोजी अटक केली. ही कारवाई प्रभारी पोलीस आयुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाळासाहेब शिंदे, फौजदार शैलेश खेडकर, सहा. फौजदार जयंत चवरे, हवालदार अशोक लोखंडे, पोलीस राजू चव्हाण, शंकर मुळे, सुहास अर्जुन, सचिन होटकर, संतोष येळे, जयसिंग भोई, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, स्वप्नील कसगावडे, राहू गायकवाड, काफि ल पिरजादे यांनी केली.