दातृत्व; साेनं गहाण ठेवलं, स्कूल बस विकून अनाथ मुलांच्या अडचणी सोडविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 05:59 PM2021-04-07T17:59:00+5:302021-04-07T18:01:20+5:30
कोरोनाकाळातही सामाजिक संस्था, संघटनांची बांधिलकी- लोकवर्गणीतून मातृभूमी पोहोचवितेय अनाथ, निराधारांसह कोरोनाग्रस्तांना डबे
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट घोंघावत आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने सुरू असलेल्या अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच परिस्थितीत सोलापूर शहरातील प्रार्थना फाउंडेशनचे प्रमुख प्रसाद व अनू मोहिते यांनी कोरोना काळातही अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवण्यासाठी स्वत:च्या घरातील सोनं अन् स्कूल बस विकून संस्थेचा उदरनिर्वाह भागविला. शेकडो मुलं आजही या संस्थेच्या शाळेत आनंदात शिकत आहेत.
कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आले होते. याचकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाला, आर्थिक घडी विस्कटली. दोन वेळचं जेवण मिळेनासे झाले होते. अशातच शहरातील सामाजिक संस्था, संघटना, दानशूर व्यक्तींच्या दातृत्वामुळे अनेकांची दोन वेळच्या जेवणाची गरज भागली, अन्नधान्य, किराणा साहित्य मिळाल्याने अनेकांना मोठा आधार मिळाला. जिथं चार ते पाच माणसं असलेली कुटुंबे या कोरोनामुळे अडचणीत आली होती, तिथे शेकडो मुलं, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे काय, असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, प्रत्येक संस्थेने लोकवर्गणी, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, प्रतिष्ठित लोकांच्या मदतीने दोन वेळच्या जेवणासह अन्य अडचणी सोडविल्या.
मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी
बार्शी शहरातील मातृभूमी प्रतिष्ठान ही अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून निराधार, अनाथ, वंचितांसह ज्येष्ठांना दोन वेळेच्या जेवणाची डबे पोहचविण्याचे सामाजिक काम करते. यंदा कोरोनाचे संकट आले, त्याचाही सामना करीत कोरोनाग्रस्त रुग्णांनाही डबे पोहचिण्याचे काम ही संस्था करीत आहेत. कोरोनामुळे सुरुवातीच्या काळात अडचणी आल्या मात्र लोकवर्गणीतून आजही हजारो लोकांना डबे पोचविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
--------
प्रार्थना फाउंडेशन, सोलापूर
अनाथ, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब, बेघर, निराधार, स्थलांतरित कुटुंबातील मुलांना निवासी शिक्षण देण्याचे काम करते. या संस्थेला कोरोनाच्या काळात सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र, त्याची सोडवणूक करण्यासाठी सोनं अन् स्कूल बस विकली. शिवाय अनेक सामाजिक संस्था, संघटनांच्या मदतीने आजही संस्थेतील मुलांना जेवण व इतर सेवासुविधा पुरविण्यात येत असल्याचे प्रार्थना फाउंडेशनचे प्रमुख प्रसाद मोहिते यांनी सांगितले.
-----------
काय म्हणतात सामाजिक कार्यकर्ते...
कोरोनाकाळात बेघरांचे मोठे हाल झाले, सुरुवातीला कोरोना संसर्ग होत असल्यामुळे पुढे कोणी आले नाही, त्याकाळात आई प्रतिष्ठाणच्या माध्यमातून रेल्वेस्टेशन, बसस्थानक, शहरातील विविध चौकांत बसलेल्या भिक्षुकांना जेवण वाटप केले. याचबरोबरच निराधार, वंचितांनाही मोठी मदत केली.
- मोहन डांगरे,
आई प्रतिष्ठान, सोलापूर
------------
कोरोनाकाळातच वंचित, अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची मदत केली. निराधार, वंचित, गरजूंना मदत करण्यासाठी संस्थेने अहोरात्र प्रयत्न केले. कोरोनासारख्या काळातही संस्थेच्या प्रत्येक सदस्यांनी घेतलेले परिश्रम खरेच ग्रेट आहेत. मागील कित्येक वर्षांपासून संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.
- महेश कासट,
श्रीमंतयोगी प्रतिष्ठान, सोलापूर