चावर.. चावर.. चांगभलं, पाऊस आला चल पुढं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:27 AM2021-09-07T04:27:47+5:302021-09-07T04:27:47+5:30
शेतकरी बैलपोळा सणाचे औचित्य साधून जनावरांना वर्षभर लागणारे साहित्य खरेदी करतात. दरम्यान, वर्षभर काळ्याआईची इमाने-इतबारे सेवा करणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता ...
शेतकरी बैलपोळा सणाचे औचित्य साधून जनावरांना वर्षभर लागणारे साहित्य खरेदी करतात. दरम्यान, वर्षभर काळ्याआईची इमाने-इतबारे सेवा करणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैल पोळ्याचा सण आनंदाने साजरा करतो. त्या अनुषंगाने बैलपोळा सणाच्या पूर्वसंध्येला रविवारी शेतकऱ्यांनी मोळाच्या साह्याने जनावरांची तेल व हळदीने खांदे मळणी करून त्यांना ज्वारीचा खिचडा खाण्यास दिला. सोमवारी सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण होते. दुपारी ३ नंतर पावसाची रिपरिप सुरू झाली ती सायंकाळपर्यंत सुरुच होती. पावसातच शेतकऱ्यांनी जनावरांना पाण्याने स्वच्छ धुऊन आंघोळ घातली. त्यानंतर त्यांच्या शिंगांना हिंगूळ व विविध रंगीबेरंगी बेगड लावून सजवले.
सायंकाळी सूर्यास्ताच्या समयी बैलांना घरासमोर बांधून त्यांची अर्धांगिनीच्या साथीने पूजा केली. यावेळी शेतकऱ्यांनी डोक्यावर शेती अवजारे घेऊन त्यावर घोंगडी पांघरून बैलांच्या सभोवताली फिरून ‘चावर.. चावर... चांगभलं, पाऊस आला चल पुढं’ अशी आळवणी करीत बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरविण्यात आला. यंदा कोरोनामुळे बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यावर बंदी असल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर मात्र विरजण पडले आहे.
फोटो ओळ ::::::::::::::
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जुनोनी येथील भाजपचे युवा नेते विलास व्हनमाने यांच्या घरी भेट देऊन बैलपोळा सणाचा आनंद द्विगुणित केला. यावेळी नाना कांबळे, शेतकरी उपस्थित होते.