रेल्वेतील नोकरीसाठी युवकाला फसवले; मुंबईच्या तिघांवर lसोलापुरात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:43 PM2021-01-23T12:43:25+5:302021-01-23T12:43:28+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर : रेल्वेच्या ‘आयआरसीटीसी’मध्ये नोकरी लावतो म्हणून सोलापूरच्या तरुणाला साडेतीन लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी मुंबईच्या प्लेसमेंट कंपनी चालक आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गौरीशंकर शरणप्पा भाईकट्टी (वय ५८, रा़ समर्थ विहार, राजमाता गार्डन, अक्कलकोट रोड) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी गौरीशंकर यांचा मुलगा हा नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे आदी ठिकाणच्या जॉब प्लेसमेंट ठिकाणी चौकशी करत होता. २०१८मध्ये गौरीशंकर यांच्या मुलाने कल्याण येथील माऊली इंटरप्रायझेस, नाना पावसे चौक येथील आरोपी सुनील सौंदणे यांच्या जॉब प्लेसमेंटमध्ये जाऊन भेट घेतली. तेव्हा सौंदणे याने रेल्वेच्या ‘आयआरसीटीसी’मध्ये नोकरीच्या जागा असून, तेथे जर नोकरी हवी असेल तर पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर सौंदणे याने फिर्यादी व त्यांच्या मुलाला मुंबईतील आरोपी सुरेश शर्मा, अजिंक्य उबाळे यांची भेट घालून दिली. तेव्हा शर्मा आणि उबाळे या आरोपींनीही फिर्यादीला नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. पण यासाठी दिल्लीला जाऊन येणे, तेथे राहाणे, खाणे व अन्य खर्च यासाठी ७ लाख ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
त्यानुसार फिर्यादींनी आरोपींना वेळोवेळी वरील रक्कम दिली. सर्व रक्कम देऊनही नोकरी न मिळाल्याने पैसे परत देण्याची मागणी त्यांनी केली. आरोपींनी पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. तरीही फिर्यादीने तगादा लावून आरोपींकडून ४ लाख ४ हजार रुपये वसूल करून घेतले. त्यानंतर संपर्क साधूनही आरोपीने फिर्यादीची ३ लाख ४६ हजार रुपये न देता फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी सुनील सौंदणे, सुरेश शर्मा, अजिंक्य उबाळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई राठोड करत आहेत.