लग्नाचं आमिष दाखवून रिक्षातून नेलं; फोटो काढून सोशल मिडियावर व्हायरल
By विलास जळकोटकर | Published: October 21, 2023 04:11 PM2023-10-21T16:11:32+5:302023-10-21T16:11:37+5:30
दोघा मित्रांविरुद्ध पिडितेची तक्रार दिल्याने गुन्हा दाखल
सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला रिक्षात बसवून नेले आणि वाटेत तिच्यासमवेतचे फोटो काढून मित्राला शेअर केला. त्याने तो सोशल मिडीयावर व्हायरल केला. रूपा भवानी मंदिर परिसरात बुधवारी सकाळी साडेसात व सायंकाळी पाचच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा जेलरोड पोलीस ठाण्यात नोंदला आहे.
राकेश पाराजी शिंगाडे, अजय शिंगाडे (दोघे रा. सोलापूर) गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत. घटनेच्या दिवशी यातील पिडित मुलगी राजेंद्र चौकातील बस स्टॉप वर थांबलेली होती. यावेळी यातील आरोपी तेथे आला. त्याने ‘तुला बोलायचे आहे’ असे म्हणत रिक्षात बसवून रूपा भवानी मंदिर परिसरात नेले. वाटेत त्याने पिडितेला ‘मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, तू मला लग्नाला नकार देऊ नको. तुझ्याशी लग्न केल्यानंतर मी सुधारेल’ असे गोड बोलून तिला विश्वासात घेऊन तिच्यासोबत फोटो काढले. तो फोटो त्याने अजय शिंगाडे याला पाठवला व त्याने तो त्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. अशाप्रकारे पिडितेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास सपोनि घाडगे करीत आहेत.