बिलासाठी रूग्णांना त्रास देणाºया खासगी हॉस्पिटलची बिले ऑडिटरकडून तपासा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:49 AM2020-07-20T10:49:58+5:302020-07-20T10:57:01+5:30
राजेश टोपे यांचे सोलापूर महानगरपालिकेला आदेश; क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना उत्तम सुविधा मिळायला हव्यात
सोलापूर : खासगी रुग्णालयांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार बिलांची आकारणी होते की नाही हे पाहण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ऑडिटर नेमावेत. आॅडिटरच्या सहीनंतरच रुग्णांच्या नातेवाईकांना बिल देण्यात यावे, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
शहरातील आयएमएच्या डॉक्टरांनी किमान चार तास कोविड हॉस्पिटलमध्ये सेवा देणे बंधनकारक केले आहे. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी यावर लक्ष ठेवावे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसीवर हे इंजेक्शन परिणामकारक ठरले आहे. गोरगरिबांना हे इंजेक्शन मोफत उपलब्ध व्हावे यासाठी सीएसआरमधून हे इंजेक्शन उपलब्ध करुन दिले आहे. दिल्लीतून टेली आयसीयू सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. चांगले तज्ज्ञ डॉक्टर्स टेली आयसीयूच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. येत्या दोन ते दिवसांत ही सेवा सुरू होईल, असेही टोपे यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करा. महापालिका यात कमी पडत आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगल्या सुविधा मिळायला हव्यात. हे सेंटर घरासारखे वाटायला हवे. सिव्हिलमध्ये १२० बेड वाढविण्यात येत आहेत. शहरात जास्तीत चाचण्या व्हायला हव्यात, असेही टोपे म्हणाले.
प्रांताधिकाºयांबद्दल तक्रारी
बार्शीच्या आरोग्य विभागाला प्रांताधिकाºयांनी काम करू दिले नाही. त्यामुळे या तालुक्यात कोरोना वाढला. या अधिकाºयाला तत्काळ बदला, अशी मागणी खासदार निंबाळकर, आमदार राऊत यांनी केली. बार्शीतील कामाबाबत शरद पवार, पालकमंत्री भरणे यांच्यासह इतर नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.