विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपन; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:04 IST2025-03-13T18:02:15+5:302025-03-13T18:04:34+5:30
रासायनिक लेपनास मंदिर महासंघ आणि वारकरी यांचा तीव्र विरोध आहे.

विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपन; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
पंढरपूर : "अल्पावधीत रासायनिक लेपन परत करावे लागल्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेल्या रासायनिक लेपनास मंदिर महासंघ, वारकरी यांचा तीव्र विरोध आहे," अशी भूमिका मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी मांडली आहे.
श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरे तर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले. ते करण्यात आले तेव्हाच पुढे ८ ते १० वर्ष त्याला काही होणार नाही, असे सांगण्यात आले होते. असे होते, तर ४ वर्षापूर्वीच लेपन केलेले असताना ते परत परत का करावे लागते? लेपन ४ वर्षांतच करावे लागते याचा अर्थ 'यापूर्वीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले', असेच म्हणावे लागेल. खरे पहाता देवतेच्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारे रासायनिक लेपन करणे, ही पूर्णतः धर्मशास्त्रविसंगत कृती आहे. मुळापासून उपाययोजना न काढता रासायनिक लेपनासारखी वरवरची उपाययोजना काढल्याने देवतेच्या मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतात, हेही ध्यानात घ्यायला हवे. त्यामुळे रासायनिक लेपनास मंदिर महासंघ आणि वारकरी यांचा तीव्र विरोध आहे.
अशाच प्रकारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर वर्ष २०१५ मध्ये मूर्तीवर वज्रलेपनाची प्रक्रिया केली होती. नंतर जेमतेम २ वर्षातच देवीच्या मूर्तीवरील लेप निघायला आरंभ झाला. मूर्तीवर पांढरे डाग पडायला लागले आणि मूर्तीची झीज होतच राहिली. हिंदू जनजागृती समितीने या रासायनिक प्रक्रियेला विरोध करूनही धर्मसंमत नसलेले हे रासायनिक लेपन भाविकांवर लादले गेले. मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्यापूर्वी मंदिरे समितीने 'गतवेळच्या लेपनाचा अहवाल घोषित करावा, तसेच ज्यांनी हे लेपन केले त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही घनवट यांनी स्पष्ट केले आहे.