पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला येणार पुन्हा मूळरुप, चेन्नईतील केमिकल तज्ज्ञांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:45 PM2018-10-11T12:45:06+5:302018-10-11T12:47:23+5:30
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर हे प्राचीन आहे. या मंदिराचे संवर्धन करणे व प्राचीन शैली जपणे आवश्यक आहे.
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर हे प्राचीन आहे. या मंदिराचे संवर्धन करणे व प्राचीन शैली जपणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मंदिरातील रंग दिलेला काही भाग बुधवारी चेन्नई येथील केमिकल तज्ज्ञांनी स्वच्छ केला. यामुळे मंदिराला मूळरुप प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगरंगोटी केली होती. त्यामुळे मंदिराचे हेमाडपंथी रूप नष्ट झाले होते. परंतु मंदिर मूळ रूपातच आकर्षक दिसते, ही गोष्ट मंदिर समितीच्या लक्षात आली. यामुळे मंदिर समितीने लाखो रुपये खर्च करून नामदेव पायरी ते विठ्ठल गाभारा आदी ठिकाणी रंग काढून घेतला होता. मात्र मंदिरातील काही भाग तसाच राहिला होता. पुरातन विभागाच्या परवानगीने रुक्मिणी गाभारा, महालक्ष्मी मंदिर व अन्य ठिकाणचा रंग केमिकल तज्ज्ञांकडून काढण्यात येणार आहे.
या कामासाठी चेन्नई येथील केमिकल तज्ज्ञ गुरु मुरगन सथपाथी, मंदिर कायदा तज्ज्ञ जगन्नाथ, चैतन्य महाप्रभू निंबकशक केंद्र या संस्थेचे आऱ वेंकटेशन व जय हनुमान सेवा संस्थेचे व्यवस्थापक ट्रस्टीचे श्रीनिवासन माती हे मंदिरात आले होते. त्यांनी प्रायोगिक स्वरूपात विठ्ठल मंदिराच्या काही भागांचे केमिकल वापरून रंगकाम काढण्याचे काम केले.
चेन्नईतील संस्था केमिकलच्या साह्याने रंग काढण्याच्या कामाचा आराखडा तयार करून तो मंदिर समितीसमोर मांडणार आहे. त्यानंतर रंग काढल्यानंतर मंदिर कसे दिसते याचेही सादरीकरण होणार आहे. त्यानंतरच उर्वरित कामाला मंजुरी देण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
तसेच मंदिरातील फरशा काढून त्याठिकाणी दगड बसविण्यात येणार आहे. त्या दगडांचे नमुनेदेखील मंदिर समितीच्या अधिकाºयांना दाखवण्यात आले आहे.
पोनिंग बसविणार
मंदिरातील बाजीराव पडसाळी येथील छत काढण्यात आला आहे. त्याठिकाणी पोनिंग बसविण्यात येणार आहे. हे पोनिंग बसविण्याचे काम चेन्नई येथील एका संस्था मोफत करुन देणार आहे.