छत्रपतींचा झाकोळलेला पुतळा दर्शनी भागात हलविणार; सोलापूर जिल्हा परिषदेच्या उद्यान विभागाचा लूक बदलणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 06:59 PM2019-02-06T18:59:29+5:302019-02-06T19:02:51+5:30
सोलापूर : रंगभवन चौकातील जिल्हा परिषदेच्या उद्यान विभागात झाडांनी झाकोळलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता शिवप्रेमींच्या नजरेत येण्यासारखा म्हणजेच ...
सोलापूर : रंगभवन चौकातील जिल्हा परिषदेच्या उद्यान विभागात झाडांनी झाकोळलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता शिवप्रेमींच्या नजरेत येण्यासारखा म्हणजेच दर्शनी भागात हलविण्यात येणार आहे.
दर्शनी भागात पुतळा उभारण्यासह सांस्कृतिक भवनामुळे उद्यान विभागाचा लूक बदलणार आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आलेल्या बैठकीत मराठा समाजातील १४ संघटनांच्या उपस्थितीत निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
रंगभवन चौकाकडून जिल्हाधिकारी निवास आणि रंगभवन ते हरिभाई देवकरण प्रशालेच्या मार्गावर जिल्हा परिषदेचे उद्यान आहे. उद्यानाच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे; परंतु अवतीभोवती असलेल्या गर्द झाडांमध्ये तो पुतळा पूर्णत: झाकोळला आहे. त्यामुळे रस्त्यांवरुन येणाºया-जाणाºयांना या पुतळ्याचे दर्शनच घडत नाही. बहुतांश जणांना या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, याची कल्पनाच नाही.
वास्तविक जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून असलेला शिवरायांचा हा पुतळा शिवप्रेमींच्या नजरेआड झाला आहे. आता तो त्याच उद्यानात, परंतु दर्शनी भागात उभारावा, अशी सकल मराठा समाज आणि तमाम शिवप्रेमींची मागणी होती.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी ती मागणी मान्य केली आहे. उद्यानाचा लूक बदलताना छत्रपतींचा हा पुतळा रंगभवन चौकासमोर अथवा ह. दे. प्रशालेच्या समोरील दर्शनी भागात बसविण्याबाबत चर्चा झाली.
सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष माऊली पवार, विलास लोकरे, राम साठे आदींनी मंगळवारी सकाळी उद्यानातील जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता रमेश चौगुले उपस्थित होते.
१२ फेब्रुवारीला आराखडा सादर होणार
- सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष माऊली पवार यांनी अतिक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांची भेट घेऊन नियोजित आराखडा सादर केला. वास्तुविशारद राहुल खमितकर यांनी तयार केलेल्या आराखड्यात २७ गाळे, दोन मोठे हॉल, एक कार्यालय, सार्वजनिक स्वच्छतागृहाचा समावेश आहे. मात्र डॉ. गुंडे यांनी व्यापारी गाळेऐवजी हुतात्मा स्मृती मंदिराच्या धर्तीवर किमान ५०० प्रेक्षक अथवा त्याहूनही अधिक प्रेक्षकांची आसन व्यवस्था होईल, अशा पद्धतीने सभागृहाची संकल्पना सुचविली आहे. आता त्यात बदल करुन नव्याने तयार झालेला आराखडा १२ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे डॉ. गुंंडे यांनी माऊली पवार यांना सुचविले आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून निधी मिळावा- लोकरे
स्मार्ट सिटी योजनेतून रंगभवन आणि होम मैदानाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. याच रंगभवन चौकात जिल्हा परिषदेचे उद्यान आहे. त्यामुळे उद्यानासह आतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे, अशी शिवप्रेमींची मागणी आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुशोभीकरणाच्या कामास निधी मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास लोकरे यांनी व्यक्त केली आहे.
नव्याने पुतळा बसविण्याबाबत विचार
जिल्हा परिषदेच्या स्थापनेवेळी बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आजही शिवप्रेमींना प्रेरणा देत उभा आहे. जिल्हा परिषदेच्या मदतीने नव्याने पुतळा बसविण्याबाबतही मराठा समाजातील नेतेमंडळी आणि शिवप्रेमी विचार करीत आहेत. १४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया बैठकीत यावर चर्चाही होणार आहे.