शिवजन्मोत्सवाची तयारी... कुर्डूवाडीत एक हजार दिव्यांमधून साकारणार छत्रपतींचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 02:11 PM2019-02-07T14:11:25+5:302019-02-07T14:12:15+5:30
कुर्डूवाडी : शिवजयंतीनिमित्त कुर्डूवाडी शहरात विविध मंडळांच्या वतीने शिवजन्मोत्सव, शिवदीपोत्सव, पोवाडा, महिलांची पालखी असे विविध कार्यक्रम होणार आहेत. २१ ...
कुर्डूवाडी : शिवजयंतीनिमित्त कुर्डूवाडी शहरात विविध मंडळांच्या वतीने शिवजन्मोत्सव, शिवदीपोत्सव, पोवाडा, महिलांची पालखी असे विविध कार्यक्रम होणार आहेत. २१ फेब्रुवारी रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शहरातील चौकाचौकात शामियाने, महाराजांना अभिवादन, पोवाडे, महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात येणार आहे. शिवप्रेमींनी आपल्या घरावर व मोटरसायकलला भगवे ध्वज लावले आहेत. शिवजयंतीची तयारी शहरात दोन ते तीन महिन्यांपासून सुरु झाली असून, ठिकठिकाणी बैठका होत आहेत.
शिवप्रतिष्ठान क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजता आंतरभारती प्रशालेच्या मैदानात कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत यांचा पोवाडा होणार आहे. सिनेस्टार सत्यानंद गायतोंडे हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या वतीने १९ रोजी पोस्ट रोडला शिवदीपोत्सव सोहळा करण्यात येणार असून, एक हजार दिव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटण्यात येणार आहे. मावळा प्रतिष्ठानच्या वतीने १९ रोजी महिलांची पालखी मिरवणूक, मोटरसायकल रॅली होणार आहे.
श्री संतसेवा मंडळाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा १९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आला असून, यासाठी बनारसहून कलाकार आणण्यात आले आहेत. कथेत श्रीकृष्णाचे पूर्ण चरित्र सांगण्यात येणार आहे. ही कथा संत सावता माळी यांचे वंशज भागवताचार्य ह. भ. प. प्रकाश महाराज वृंदावनवासी शिंदखेडा-धुळे हे सांगणार असल्याचे संत सेवा मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
शिवभक्तांच्या उत्साहाला आले उधाण
- महाराजांसारखी दाढी ठेवण्याची व कपाळावर चंद्रकोर काढण्याची क्रेझ तरुणांत वाढत असून, अनेकांनी आपल्या दाढीच्या आकाराची स्टाईल त्या पध्दतीने केली आहे. यासाठी त्यांची खास सलूनवाल्याकडूनच दाढी कोरण्यासाठी गर्दी वाढत आहे. शिवभक्तांमध्ये सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.