छकड्यास स्वत:ला जुंपून आळंदीपासून पंढरीच्या दर्शनास भाऊ-वहिनींना आणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:26 PM2019-07-12T12:26:03+5:302019-07-12T12:28:14+5:30
दिलेला शब्द पूर्ण केला; कर्जत तालुक्यातील फुलचंद कायगुडे यांची अनोखी वारी
यशवंत सादूल
पंढरपूर : व्यवसायाने मेंढपाळ असलेले नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील फुलचंद कायगुडे यांनी आपले बंधू तुकाराम व वहिनी निळाबाई कायगुडे यांना छकड्यात बसवून ते स्वत: ओढत आणून त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यांना दिलेला शब्द पाळला.
गुरुवारी सकाळी सर्व वारकरी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी एकच गर्दी केली होती. पंढरपुरातील सर्व रस्त्यांवरील वारकरी नदीकडे जाण्यासाठी धडपड करत होते. त्याच गर्दीत एक घोळका ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करीत येत होता. एका छकड्यावर एक जोडपे दोन-तीन मेंढरे घेऊन बसलेले होते. छकडा चक्क एक व्यक्ती ओढत होती. कपाळाला भंडारा लावलेली एक व्यक्ती सर्वांना सरका... सरका असे म्हणत पुढे येत होती. ती व्यक्ती म्हणजे फुलचंद कायगुडे. छकड्यातील जोडपे हे त्यांचे बंधू आणि वहिनी होते. अंघोळीला येणारे वारकरी छकड्यात ठेवलेल्या बाळूमामाचा फोटो आणि त्यातील मेंढ्याचे दर्शन घेत होते. गाडीत बसलेल्या जोडप्याविषयी फुलचंद यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पंढरीच्या दर्शनासाठी आणल्याचे सांगितले.
फुलचंद यांचे मोठे बंधू तुकाराम यांची आळंदी ते पंढरपूर वारी करण्याची तीव्र इच्छा होती, परंतु शरीर साथ देत नसल्याने ते शक्य होत न्हवते. त्यांनी ते शल्य आपला भाऊ फुलचंद यांच्याजवळ बोलून दाखविले. दरम्यान, त्यांच्या वहिनींनी वारी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच वेळेस फुलचंद यांनी मी स्वत: छकडा ओढत पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घडवून आणण्याचे वचन दिले. यंदा ते पूर्ण करत आहेत. या अनोख्या वारीबद्दल बोलताना फुलचंद कायगुडे म्हणाले की, आमचे बंधू आणि वहिनींनी वारीची इच्छा व्यक्त केली, त्यातच आमच्याकडे दोन मेंढरेही अधू जन्मली. त्याच दिवशी ठरविले की, वारी घडवून आणायची. शब्द दिल्याप्रमाणे स्वत: छकडा ओढत आणून पंढरीत दाखल झालो आहे. पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करणार आहे.