मराठा आरक्षणासाठी छावा संघटना आक्रमक; दशक्रिया विधी अन् मुंडन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 12:28 PM2021-06-23T12:28:13+5:302021-06-23T12:28:18+5:30
छावा संघटना आक्रमक - केंद्र व राज्य शासनाच्या विराेधात घोषणाबाजी
सोलापूर -: केंद्र व राज्य शासन मराठ्यांच्या मागण्याबाबत व मराठा आरक्षणाबाबत सातत्याने उदासीन भूमिका घेत आहे. त्यामुळे राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाचा दशक्रिया विधी व मुंडन करून निषेध आंदोलन करण्यात आले. या दशक्रिया विधी व मुंडन आंदोलनात छावाचे तालुकाध्यक्ष रविकांत पाटील यांनी केंद्र सरकारचा, तर अविनाश पाटील यांनी राज्य सरकारचा दशक्रिया विधी करून मुंडन केले.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकाल विरोधात तर केंद्र सरकारने इंदिरा सहानी निकालातील ५० टक्के मर्यादा विरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली नाही. केंद्र सरकारने ॲट्राॅसिटी कायद्याच्या धर्तीवर संसदेच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण कायदा करून त्याला अनुसूची ९ चे संरक्षण द्यावे, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण निर्णयाविरोधात तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी, मराठा आरक्षणासाठी तातडीने स्वतंत्र ओबीसी आयोग नेमावा, जिल्हास्तरावर मराठा विद्यार्थी,विद्यार्थिंनींसाठी स्वतंत्र वसतिगृहे चालू करावीत, अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याप्ती वाढवून १ हजार कोटीचा अतिरिक्त निधी द्यावा आणि शेत मालाला हमीभाव देऊन बाजार समितीत मोफत भोजन व निवास व्यवस्था करावी, अशा मागण्याही छावाच्या वतीने यावेळी करण्यात आल्या.
----------
मुंबई येथे करणार आत्मदहन...
मराठ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने वार्षिक ३० हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज नाही दिले, तर छावाचे योगेश पवार हे दि. २७ जून २०२१ रोजी राजभवन, मुंबई येथे आत्मदहन करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या आंदोलन वेळी छावाचे योगेश पवार, सरपंच वैशाली जयवंत धुमाळ, उपसरपंच रोहन कुमार भिंगारे, संजय पारवे, ग्रामपंचायत सदस्य, जोशी समाज, लिंगायत समाज, गोसावी समाज, बौद्ध समाज, वडार समाज, कोळी समाजातील बांधव व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.