सोलापूर महानगरपालिका सभा तहकूबबद्दल मुख्यमंत्र्यांनी विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 02:24 PM2018-04-03T14:24:41+5:302018-04-03T14:24:41+5:30
सभागृह नेते संजय कोळी यांना आला फोन, विकासाचे प्रस्ताव मार्गी लावण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
सोलापूर : मनपा सभा वारंवार तहकूब करण्यात येत असल्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. चक्क सभागृहनेते संजय कोळी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शनिवारची सभा तहकूब का केली याबाबत जाब विचारला.
महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मार्च महिन्याची विशेष सभा झाली. या सभेला सत्ताधारी पक्षाचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. विरोधी पक्षाचे तीन सदस्य सभागृहात उपस्थित असल्यामुळे सभा तहकूब करण्याची नामुष्की महापौरांवर आली. महापालिकेत सत्तापरिवर्तन झाल्यापासून भाजप पदाधिकाºयांनी १५ सभा घेतल्या. यातील बहुतांश सभा तहकूब करण्यात आल्या. यामुळे प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने विकासकामे मार्गी लागण्यास अडचण निर्माण झाल्यामुळे सत्ताधाºयांविरोधात नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
शनिवारच्या सभेत अमृत योजनेतून उर्वरित हद्दवाढ भागासाठी राबविण्यात येणारी १८0 कोटींच्या ड्रेनेज योजनेच्या ठेक्याला मंजुरी, उड्डाण पुलाच्या हरकतीवर नुकसानभरपाई देण्यासाठी निर्णय घेणे, फेरीवाले व होर्डिंगच्या धोरणाला मंजुरी देण्याचे महत्त्वाचे प्रस्ताव होते. मार्च अखेरची सभा तहकूब झाल्याने महत्त्वाचे हे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत राहिले. याबाबत ओरड सुरू झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या गोंधळाची पुन्हा एकदा दखल घ्यावी लागली हे विशेष.
सभागृहनेते संजय कोळी सोमवारी दुपारी एक वाजता आपल्या कार्यालयात कामकाज करीत असताना मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकांचा मोबाईलवर कॉल आला. त्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहनेते कोळी यांच्याशी संवाद साधला. मनपाच्या सभा तहकूब का केल्या जात आहेत. शनिवारच्या सभेतील ड्रेनेजच्या विषयावर निर्णय का घेतला नाही असा जाब विचारला. त्यावर सभागृहनेते कोळी यांनी घडल्याप्रकाराची माहिती दिली. यापुढे सभेचे कामकाज व्यवस्थित चालवा व विकासाचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावा अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर सभागृहनेते कोळी यांनी तातडीने महापौर शोभा बनशेट्टी व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप कळविला.