मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांची वैरागला अनोखी भेट, पेशवेकालीन तलाव सुशोभीकरणासाठी १ कोटी ७६ लाख मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:21 PM2018-02-10T12:21:43+5:302018-02-10T12:24:15+5:30
जावयाच्या प्रेमामुळे वैराग (ता. बार्शी) चे भाग्य उजळले आहे. वैरागमधील पेशवेकालीन गावतलाव आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विभागाने १ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे
राकेश कदम
सोलापूर दि १० : जावयाच्या प्रेमामुळे वैराग (ता. बार्शी) चे भाग्य उजळले आहे. वैरागमधील पेशवेकालीन गावतलाव आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विभागाने १ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातील २५ लाख रुपये तत्काळ वितरित होणार आहेत. या कामी वैरागचे जावई आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
वैरागच्या गावतलावाचे सुशोभीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी ओमप्रकाश शेटे चार महिन्यांपासून पाठपुरावा करीत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी फाईल पाठवली होती. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने नुकतेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी १२१ कोटी निधी वितरित करण्याचे आदेश दिले.
यात वैरागच्या गावतलावाच्या कामाचाही समावेश आहे. ओमप्रकाश यांच्यामुळे वैरागला काही दिवसांपूर्वी तीर्थक्षेत्र विकास निधीतून २५ लाख रुपये मिळाले आहेत.
---------------------------
मूळगावीही ६ कोटींची कामे
- ओमप्रकाश हे सोलापुरातील नामवंत शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांचे बंधू. दिंद्रुड (ता. माजलगाव, जि. बीड) हे त्यांचे मूळ गाव. दिंद्रुडमध्ये जलयुक्त शिवार, तीर्थक्षेत्र विकास निधी अशा विविध विभागातून ६ कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला आहे.
च्सासरे नागेश फलफले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ओमप्रकाश आणि त्यांच्या पत्नी शिल्पा यांनी कोरफळे येथील स्नेहग्रामला सव्वा लाख रुपयांचे सोलर युनिट आणि १ लाख रुपयांचा हायमास्ट भेट दिला.
-----------------
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि राज्यमंत्री मदन येरावार यांच्या सहकार्यामुळे १ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, वैराग ग्रामपंचायत व निरंजन भूमकर यांनीही विशेष सहकार्य केले.
-ओमप्रकाश शेटे
--------------------
अशी होतील कामे
- गावालगत घाट बांधणे ३० लाख ३९ हजार
- शौचालय बांधणे ६ लाख ४८ हजार
- जॉगिंग ट्रॅक बांधणे ७९ लाख १७ हजार
- बागबगिचा व बालोद्यान २४ लाख ९३ हजार
- पथदिवे व हायमास्ट बसविणे ३५ लाख २८ हजार