मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्याला न्याय दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:24 AM2021-05-20T04:24:05+5:302021-05-20T04:24:05+5:30

राज्य शासनाच्या आदेशाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी टीकेची झोड उठविल्याने उजनीच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. ...

The Chief Minister gave justice to Solapur district | मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्याला न्याय दिला

मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्याला न्याय दिला

Next

राज्य शासनाच्या आदेशाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी टीकेची झोड उठविल्याने उजनीच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांमधून जागृतीचे काम सुरू केले होते.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आ. शहाजीबापू पाटील यांच्याही घरासमोर शेतकरी नेते माऊली हळणकर व दीपक भोसले यांनी हलगीनाद आंदोलन करून सर्वांचेच लक्ष वेधले होते. यावेळी आ. शहाजीबापू पाटील यांनी उजनीच्या पाण्यावरून अतिशय आक्रमक भूमिका घेत राज्य शासनाच्या या निर्णयास कडाडून विरोध केला व रक्तरंजित लढाईचा इशाराही दिला होता. थेट माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उडवली होती. ही टीका राज्यभर चर्चेचा विषय झाला.

दुष्काळी सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी वरदायिनी आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्याची मदार उजनीवर अवलंबून आहे. उजनी पाणी वाटप यापूर्वी ठरले असतानाही त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ माजल्याने आपण याविषयी परखडपणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा माजी केंद्रीय मंत्री खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन उजनीबाबत काढलेला आदेश तत्काळ रद्द केला असल्याचे आ. शहाजीबापू पाटील म्हणाले.

-----

११७ टीएमसी क्षमता असणाऱ्या उजनी धरणाच्या निर्मितीपासून एक थेंबही पाणी अद्यापपर्यंत सांगोला तालुक्याला मिळालेले नाही. २१-२२ वर्षाहून अधिक काळ उजनीच्या पाण्यासाठी सांगोल्यातील जनता संघर्ष करीत आहे. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडून त्यांच्या कार्यकाळात सांगोला उपसा सिंचन योजना मार्गी लागेल, अशी अपेक्षा व भावना होती. मात्र येथील जनतेची अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्यामुळे हा उद्रेक असून पाणी मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.

- ॲड. शहाजीबापू पाटील, आमदार, सांगोला विधानसभा मतदारसंघ

Web Title: The Chief Minister gave justice to Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.