मुख्यमंत्री ग्राम योजना; सोलापूर जिल्ह्यात नव्याने ५०० किलोमीटरचे रस्ते होणार
By Appasaheb.patil | Published: October 6, 2022 06:22 PM2022-10-06T18:22:42+5:302022-10-06T18:22:48+5:30
गावागावातील वाहनधारकांचा प्रवास सुपरफास्ट होणार
सोलापूर : मुख्यमंत्री ग्राम योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यात आगामी काळात ४९९ किलोमीटरचे रस्ते होणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहनधारकांचा प्रवास आता सुपरफास्ट होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
शासन ग्रामविकास विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-१ च्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-१ सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ साठी सोलापूर जिल्ह्यासाठी ४९९ किमीचे उद्दिष्ट निश्चित केले असून त्यासाठी ३७४.२५ कोटी खर्च अपेक्षित धरून त्याची माहिती पालकमंत्री विखे-पाटील यांनी देऊन त्यापैकी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षासाठी १०० कोटी (प्रत्येक वर्षी ५० कोटी) निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सन २०२३-२४ साठी आराखडा तयार करताना ५० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात येणार असून सन २०२२-२३ साठी पूर्वनियोजनाद्वारे ५० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
----------
रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक
जिल्ह्यातून जाणारे सर्व राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत असलेल्या सर्व समस्येच्या अनुषंगाने एक स्वतंत्र आढावा बैठक संबंधित विभागाची घेण्यात येईल व जिल्ह्यातील सर्व नादुरुस्त रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे विखे-पाटील यांनी सांगितले. भूमी अभिलेख विभागाने नवीन तंत्रज्ञाचा वापर करून त्यांच्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करावी व जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाची या विभागाच्या अनुषंगाने तक्रार येणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.