सत्तेसाठी मुख्यमंत्री हतबल, म्हणूनच मलिकांचा राजीनाम घेत नाहीत; प्रवीण दरेकरांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 05:56 PM2022-03-01T17:56:49+5:302022-03-01T17:56:55+5:30
विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची साेलापुरात मागणी
साेलापूर -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे मंत्री संजय राठाेड यांचा राजीनामा घेतला. मित्रपक्ष राष्ट्रवादी नाराज हाेईल या भीतीमुळे ते नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाहीत. उध्दव ठाकरे हतबल आहेत, असे मत विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.
भाजपचे ‘नवाब मलिक हटाव देश बचाओ अभियान’ सुरू आहे. या अभियानाची माहिती देण्यासाठी मंगळवारी त्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजय देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख आदी उपस्थित होते. दरेकर म्हणाले, नवाब मलिक प्रकरणाची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी भाजपने अभियान सुरू केले. महाविकास आघाडीच्या दाव्यानुसार ही अलिकडच्या काळातील कारवाया सूडभावनेने हाेत आहेत. हे चुकीचे आहे. अनिल देशमुखांवर तत्कालीन पाेलिस आयुक्तांच्या तक्रारीनंतर कारवाई झाली.
केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून संबंधितावंर जी कारवाई करण्यात येत आहे, त्याचा भाजपचा कुठलाही संबंध नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जी कारवाई झाली, त्यासाठी भाजपने तक्रार केली नव्हती. भाजपाचा त्याचा काही संबंध नव्हता. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्तांनी खंडणीची तक्रार केली. मग त्यातून अँटिलीया प्रकरण, हिरेन हत्या प्रकरण, सचिन वाझे यांचे नाव आले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याही प्रकरणात ईडी चौकशी करतेय, आम्ही कुठेही तक्रार केलेली नाही. माजी वनमंत्री संजय राठोड यांनी एका महाराष्ट्राच्या लेकीला आत्महत्या करायला भाग पाडले. सरकारने पोलिसांवर दबाव आणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकरणात साधा एफआयआरदेखील नोंदविला नाही. ही सर्व प्रकरणे लाेकांना समजली आहेत.
----
महाआघाडीकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न
नवाब मलिक यांनी दाउद इब्राहीमच्या नातेवाईकांशी जमिनीचे व्यवहार केले. अतिरेक्यांशी संबंध असलेल्यांची बाजू घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यामध्ये सामील होतात. दुसऱ्या बाजूला महाआघाडीकडून या प्रकरणाला मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आराेपही दरेकर यांनी केला.