रणजितसिंह डिसले यांचे मुख्यमंत्री, राज्यपालांनी केले कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:47 AM2020-12-05T04:47:40+5:302020-12-05T04:47:40+5:30
बार्शी (जि. सोलापूर) ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह ...
बार्शी (जि. सोलापूर) ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो व अशा उपक्रमशील शिक्षकांची राज्य तसेच देशाला गरज आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी रणजितसिंह डिसले यांचे ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक केले. राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि मुलांमध्ये शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाचे स्वागत आहे, असेही ठाकरे म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही डिसले यांचे अभिनंदन केले. नावीन्यपूर्ण संकल्पना तसेच तंत्रज्ञानाची मदत घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे डिसले यांचे कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद असल्याचे कोश्यारी यांनी म्हटले आहे.
रणजितसिंह तुमचं मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डिसले यांचे कौतुक केले.
खासदार सुप्रिया सुळे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
बार्शीतील अलीपूर रोड भागात राहत असलेले सेवानिवृत्त शिक्षक महादेव डिसले यांचे घर हे कालपासून केंद्रबिंदू झालं आहे. रात्रीपासून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध राज्य व देश पातळीवरील मीडियानेही याची दखल घेतली आहे.