मुख्यमंत्री 'हो-हो' म्हणाले, पण शेवटी दुष्काळग्रस्त बार्शीकरांना दुखावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 07:23 PM2018-11-01T19:23:40+5:302018-11-01T19:32:51+5:30
पावसानं न पडून झोडपल पण, निदान राजानं गाऱ्हाण ऐकलं असं यावेळी बार्शीकरांना वाटलं होत. तालुक्याच्या तिन्ही नेत्यांनी सांगितल्यावर आता मुख्यमंत्रीमहोदय नक्कीच बार्शी
बार्शी - राज्य सरकारने 151 दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा समावेश असून बार्शी आणि उत्तर सोलापूरला वगळण्यात आले. त्यामुळे, हो-हो म्हणूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर 3 लाख बार्शीकरांना दुखावलं आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील इतर 9 तालुक्यात गंभीर दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूर दौऱ्यावर असताना बार्शी तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होत. विशेष म्हणजे आमदार दिलीप सोपल यांच्याशी बोलताना तर, "दिलीपराव, काळजीच करु नका, तुमच्या सुचनेप्रमाणे ट्रिगर 1 ट्रिगर 2 मध्ये नसला तरी ग्राऊंड सर्व्हेच्या आधारे बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश होणारच" अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांचे लाडके राजाभाऊ आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्याही निवेदनाला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तर, तालुक्यातील दुसरे भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनाही मुख्यमंत्र्यांनी खासगीत खात्री दिली होती, पण मिरगणे यांनी प्रसिद्धीला महत्व दिले नाही.
पावसानं न पडून झोडपल पण, निदान राजानं गाऱ्हाण ऐकलं असं यावेळी बार्शीकरांना वाटलं होत. तालुक्याच्या तिन्ही नेत्यांनी सांगितल्यावर आता मुख्यमंत्रीमहोदय नक्कीच बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करतील अशीही अपेक्षा होती. पण, अखेर बार्शीला वगळूनच राज्यातील 151 दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर झाली. बार्शी तालुक्यातील 71,873.01 हेक्टर खरीप क्षेत्र पावसाअभावी वाया जाण्याच्या मार्गांवर आहे. तर, रब्बी हंगामात केवळ 10 टक्केच पेरणी झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात साधं टिफनही चाललं नाही. पावसाअभावी तालुक्यातील 50 टक्के खरीप पीके वाया गेल्याचा अहवाल जिल्हाधिकारी साहेबांना पाठवल्याच तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी सांगितलं. मात्र, तरीही बार्शीला दुष्काळ यादीत स्थान न दिल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. 'राजानं मारलं अन् निसर्गानं झोडपलं'! सांगणार कोणाला ? अशी दयनीय अवस्था तालुक्यातील आता बळीराजाची झाली आहे. त्यामुळे, फडणवीस साहेबांनी स्पेशल कॅटीगिरीत बार्शी तालुक्याचा समावेश करून बार्शीला दुष्काळ यादीत स्थान द्यावे, जेणेकरून मुख्यमंत्री शब्दाचे पक्के आहेत, असा बार्शीकरांचा विश्वास दृढ होईल.