मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, दुष्काळाच्या छायेतील बार्शीकरांना 'असा' आधार दिला!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 05:55 PM2018-11-02T17:55:26+5:302018-11-02T17:57:23+5:30
राज्य सरकारने 180 तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर, 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील
सोलापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शब्दाचे पक्के आहेत, असे राजकीय वर्तुळात नेहमीच बोलले जाते. मात्र, बार्शीकरांना याचा प्रत्यय आला आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत 250 महसूल मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला. त्यामध्ये बार्शी तालुक्यातील 10 पैकी 9 महसूल मंडलात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्यासह बार्शीकरांना दिलेला शब्द पाळला आहे.
राज्य सरकारने 180 तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर, 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र, या दोन्ही यादीतून सोलापूर जिल्ह्यातील बार्शीला वगळण्यात आले होते. त्यामुळे बार्शीकर नाराज झाले होते, तसेच दुष्काळ यादीत बार्शीचा समावेश व्हावा यासाठी बार्शीकरांकडून आंदोलन अन् निवेदनही देण्यात येत होते. पण, बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आणखी 250 महसूल मंडलाचा दुष्काळ यादीत समावेश केला आहे. ज्या मंडलात 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला, त्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून वगळण्यात आलेल्या बार्शी आणि उत्तर सोलापूरला स्थान मिळाले आहे. त्यामध्ये बार्शी तालुक्यातील 10 पैकी 9 मंडलांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळल्यामुळे 'निसर्गानं झोडपलं पण राजानं तारलं' असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
सोलापूर दौऱ्यावर असताना बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होत. विशेष म्हणजे आमदार दिलीप सोपल यांच्याशी बोलताना तर, "दिलीपराव, काळजीच करु नका, तुमच्या सुचनेप्रमाणे ट्रिगर 1, ट्रिगर 2 मध्ये नसला तरी ग्राऊंड सर्व्हेच्या आधारे बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश होणारच" अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांचे लाडके राजाभाऊ आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्याही निवेदनाला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तर, तालुक्यातील दुसरे भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनाही मुख्यमंत्र्यांनी खासगीत खात्री दिली होती, पण मिरगणे यांनी प्रसिद्धीला महत्व दिले नाही. दरम्यान, बुधवारी बार्शी शहर वगळता, तालुक्यातील 9 मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश केल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.