मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विठूरायासमोर नतमस्तक; विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
By Appasaheb.patil | Published: July 20, 2021 03:16 AM2021-07-20T03:16:54+5:302021-07-20T10:46:02+5:30
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभारा सजला फुलांनी
पंढरपूर/सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त आज २० जुलै २०२१ रोजी पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा भक्तीमय वातावरणात पार पडली.
दरम्यान, पहाटे सव्वा दोन वाजल्यापासून या महापुजेला सुरुवात झाली होती. दरवेळेस मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकऱ्याला या महापुजेचा मान मिळतो. मात्र यंदा वारीच नसल्याने हा मान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विणेकरी मूळचे वर्धा येथील केशव शिवदास कोलते यांना हा मान मिळाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे यांच्या समवेत वर्धा येथील केशव शिवदास कोलते व त्यांची पत्नी इंदूबाई केशव कोलते यांना यंदा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला.
आजच्या या महापुजेला मुख्यमंत्र्यांसोबतच सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. तसेच पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील यावेळी मंदिरात हजर होते.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. pic.twitter.com/LRZfzJvzKU
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 20, 2021
आषाढी एकादशीच्या महापूजेनिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर उजळून निघाले होते.
यंदा आषाढी एकादशीची महापूजा ही वारकऱ्यांविनाच पार पडली. खरं तर गेली अनेक शतकं वारीची परंपरा मात्र कोरोनाचं संकटामुळे मागील दोन वर्षापासून ही परंपरा खंडित झाली. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित येणाऱ्या माऊलींच्या पादुका यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पंढरपुरात दाखल झाल्या. यावेळी मोजके वारकरी या पालख्यांसोबत होते.
यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज ओसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, सदस्य शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर). ह. भ. प. प्रकाश नवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, सदस्य, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद व अन्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंढरपूर येथे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा - LIVE https://t.co/SEakOB1NUA
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 19, 2021