संत विद्यापीठ, टोकन पद्धत अन् स्कॉयवायक या प्रकल्पांना मुख्यमंत्र्याची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 02:58 PM2018-12-17T14:58:36+5:302018-12-17T15:00:02+5:30
विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाचा लोकार्पण सोहळा : मंदिर समिती कर्मचाºयांच्या आकृतीबंध मंजूर
पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपुरात संत विद्यापीठ असणे गरजेचे आहे़ भाविकांना तासन तास रांगेत उभे राहण्याबाबत गैरसोय होऊ नये यासाठी टोकणपद्धत आणि कुठेही गडबड गोंधळू होऊ नये शांततेत पांडुरंगाचे दर्शन व्हावे़ यासाठी या तीन प्रमुख प्रकल्पांना मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ प्रशांत परिचारक, आ़ भारत भालके, आ़ सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, मंदिर समितीचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब डांगे, माजी आ़ सुधाकरपंत परिचारक यांच्यासह मंदिर समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते़
आषाढी वारीमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येण्याची मनापासून इच्छा होती, पण आंदोलनाच्या कारणास्तव लाखो वारकºयांची गैरसोय होऊ नये म्हणून मी येणे टाळलो़ विठ्ठल हा ठायी ठायी आहे़ त्यामुळे मी माझ्या घरी विठ्ठलाची पूजा केली, असे सांगून माझ्यावर विठ्ठलाचा आशीर्वाद आहे़ त्यामुळेच मी हेलिकॉप्टर अपघातातून सुखरूप वाचलो़ कारण माझ्याशेजारी विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती होती़ विठ्ठलाच्या भक्तांना आवडेल असे भक्तनिवास येथे बांधण्यात आले आहे.
मंदिर समितीच्या वतीने प्रमुख तीन प्रकल्पासंदर्भात माझ्याकडे प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्या तीनही प्रकल्पांना मी त्वरित मान्यता देत आहे, कारण संत विद्यापीठ हे पंढरपुरात होणे गरजेचे आहे़ कारण संतांची परंपरा मोठी आहे़ ती तशीच पुढे चालू रहावी, त्यासाठी हे विद्यापीठ होणे आवश्यक आहे़ या विद्यापीठत अभ्यासासाठी देश-विदेशातून संशोधक विद्यार्थी यावेत, अशी अपेक्षा आहे़ भाविकांची रांगेत जास्त काळ थांबण्याची गैरसोय टाळण्यासाठी टोकन पद्धत आणि स्कायवॉक या तीनही प्रकल्पांना मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली़.
याशिवाय पंढरपूरच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेतून १८० कोटी दिले आहेत़ नमामि चंद्रभागाअंतर्गत चंद्रभागेचे प्रदूर्षन रोखण्यासाठी शहरात भुयारी गटारी बांधणे आवश्यक आहे़ त्यासाठी ६१ कोटी, नामसंकीर्तनासाठी ४० कोटी, ६५ एकर परिसर आणि नामदेव स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही़ पंढरपूर हे वारकरी सांप्रदायाचे केंद्र आहे़ येथील वारकरी सांप्रदायाचे संस्कार महत्वाचे आहेत़ त्यासाठी येथील विकासाला सदैव सहकार्य असेल़ मात्र मंदिर समितीच्या कोणत्याही प्रकल्पास किंवा चांगल्या उपक्रमास वारकºयांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील़ वारकरी आणि शासन यांच्या समन्वयातून पंढरपूरचा विकास केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले़ दुष्काळावर मात करण्याची ताकद मिळो, या वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ सर्वत्र पाणी आणि जनावरांना चारा टंचाई निर्माण होत आहे़ या दुष्काळावर मात करण्याची ताकद पांडुरंगानी द्यावे, एवढीच साकडे पांडुरंगाला असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले़