सौंदर्यानं नटलेल्या चिखलठाणची ओळख सर्वदूर व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:23 AM2020-12-06T04:23:45+5:302020-12-06T04:23:45+5:30

नासीर कबीर करमाळा : उजनी जलाशय परिसराला लाभलेले निसर्गदत्त सौंदर्य.. काठावरच असणारे चिखलठाणचे श्री कोटलिंग मंदिर.. करमाळा-टेंभुर्णी मार्गावरील जेऊर ...

Chikhalthan, which is full of beauty, should be known everywhere | सौंदर्यानं नटलेल्या चिखलठाणची ओळख सर्वदूर व्हावी

सौंदर्यानं नटलेल्या चिखलठाणची ओळख सर्वदूर व्हावी

googlenewsNext

नासीर कबीर

करमाळा : उजनी जलाशय परिसराला लाभलेले निसर्गदत्त सौंदर्य.. काठावरच असणारे चिखलठाणचे श्री कोटलिंग मंदिर.. करमाळा-टेंभुर्णी मार्गावरील जेऊर रेल्वे स्टेशनपासून साधारणत: पंधरा किमी अंतरावरील चिखलठाण हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यास मोठा वाव आहे.

तालुक्याच्या विस्ताराचा विचार केला तर नैऋत्य-पश्चिम बाजूला उजनी

जलाशयाचा परिसर लाभला आहे. त्यामध्ये चिखलठाणचाही समावेश आहे. जलाशयाच्या फुगवट्यातील पाण्यामुळे मूळ चिखलठाणचे चिखलठाण नं.१ व चिखलठाण नं.२ असे दोन भाग पडले आहेत. या गावादरम्यान उजनी जलाशयाच्या अगदी काठावरच प्राचीन श्री कोटलिंग मंदिर आहे. या मंदिर परिसरात सोयीसुविधा उपलब्ध झाल्यास येथे पर्यटकांची संख्या वाढणार आहे.

इथले एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर परिसरात माकड-वानरांची संख्या

मोठ्या प्रमाणात आहे. परिसरातील झाडांवर खुलेपणाने संचार करणारी ही माकडे-वानरे येथे सातत्याने दिसून येतात. या ठिकाणी बोटिंगची सोय करता येणेही शक्य आहे. तसे झाले तर पर्यटकांची संख्या वाढणार आहे. याशिवाय, उजनी जलाशय परिसरात शेकडो प्रजातीचे देशी-विदेशी पक्षी आढळून येत असल्याने त्यादृष्टीने काही ठिकाणांचा पक्षीनिरीक्षण केंद्रे म्हणून विकास केल्यास पक्षी अभ्यासकांचीही आवक-जावक वाढणार आहे, अशा भावना या परिसरातील चिखलठाणचे राजेंद्र बारकुंड, पोमलवाडीचे सूर्यकांत पाटील, केत्तूरचे ॲड. अजित विघ्ने, वांगीचे शहाजीराव देशमुख, कंदरचे नवनाथ भांगे, स्थानिकांशिवाय पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

मानवी वस्तीपासून दूर उजनी जलाशय काठावरील मंदिर, तेथील मोकळी

जागा, बोटिंगची होऊ शकणारी सोय, पक्ष्यांची मांदियाळी यांचा विचार करता स्थानिकांनी पुढाकार घेतला आणि त्याला लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावरून पाठपुरावा केल्यास चिखलठाणचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यास वाव आहे. यामुळे दळणवळण, अनेक व्यवसायांनाही चालना मिळू शकते असा सूर केत्तूरचे ॲड. अजित विघ्ने, वांगीचे शहाजीराव देशमुख, कंदरचे नवनाथ भांगे यांच्यासह अनेकांकडून उमटू लागला आहे.

Web Title: Chikhalthan, which is full of beauty, should be known everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.