जर्किनची लेस खुंटीला बांधून खेळताना गळफास बसून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:45+5:302021-02-07T04:20:45+5:30
अचकदाणी येथील नागनाथ सीताराम शेंडे शनिवारी पिसेवाडी (ता. आटपाडी) येथे डाळिंब बाग छाटणीसाठी गेले होते, तर पत्नी मनीषा ही ...
अचकदाणी येथील नागनाथ सीताराम शेंडे शनिवारी पिसेवाडी (ता. आटपाडी) येथे डाळिंब बाग छाटणीसाठी गेले होते, तर पत्नी मनीषा ही मजुरीने कारली तोडण्याकरिता शेजारच्या शेतात गेली होती, तर सोहमची आजी पारूबाई व सोहम, असे दोघेच घरी होते. सोहम टीव्ही बघत होता. काही वेळाने तो बेडवरील भिंतीला असलेल्या लाकडी खुंटीला जर्किनची टोपी बांधून गोल खेळत होता. आजी बाहेर अंगणात गेलेली होती. खेळता... खेळता... त्या लेसचा फास त्याच्या गळ्याला लागला. आत कोणीच नसल्याने त्याची तडफड कोणालाच दिसली नाही. यातच त्याचा मृत्यू झाला. चुलते महादेव शेंडे यांनी सदरच्या घटनेची माहिती सोहमचे वडील नागनाथ शेंडे यास फोनवरून कळविली. याबाबत नागनाथ शेंडे (रा. अचकदाणी) सांगोला पोलिसांत खबर दिली आहे.
खेळ जिवावर बेतला
नागनाथ शेंडे यांना मुलगा व मुलगी, अशी अपत्ये आहेत. पती- पत्नी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. सोहम हा खरात वस्ती येथील झेडपीच्या वस्तीशाळेत इयत्ता तिसरीत शिकत होता. बहीण मेघा अचकदाणीच्या शाळेत इयत्ता पाचवीत शिकत आहे. सोहम घरात टीव्ही बघत होता. आजी पारूबाई अंगणात होती. बहीण बाहेर गेलेली होती. बऱ्याच वेळानंतर आजी नातवाचा आवाज येईना म्हणून घरात गेली असता तिला सोहम खुंटीला अडकलेल्या स्थितीत आढळला. तिने हंबरडा फोडत आरडाओरडा केल्याने पुतण्या महादेव शेंडे धावत आला. त्याने चुलतभावाला कळवले. खेळ जिवावर बेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बालसंवगडी रडू लागले
आरडाओरडा, रडारड सुरू झाल्यामुळे सोहमच्या वर्गातील, गल्लीतील सवंगडी जमले. त्यांना हुंदके आवरता आले नाहीत. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सर्व मुले आपापल्या घरी आहेत. ही मुले शाळेमध्ये असती, तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती, अशी चर्चा काही पालकांनी व्यक्त केली.