रेल्वेत हरविलेल्या अमर,अकबर अन् ॲन्थनीला मिळाले आई-बाबा, सुरक्षा मोहिमेत रेल्वेचे यश
By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 19, 2023 09:03 PM2023-01-19T21:03:44+5:302023-01-19T21:04:10+5:30
रेल्वे डब्यात किंवा स्टेशनवर हरवलेल्या ५८ मुलांना घरी सुखरूप पोहोचविले.
सोलापूर :सोलापूर रेल्वे विभागाने सुरक्षा मोहीम राबविली असून, यात रेल्वे डब्यात किंवा स्टेशनवर हरवलेल्या ५८ मुलांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविले आहे. यासाठी रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष पुढाकार घेतला असून, रेल्वेत हरवलेले अमर, अकबर व अन्थोनी नामक अनेक मुलं सुखरूप त्यांच्या आई-वडिलांकडे परतल्याने संपूर्ण रेल्वे प्रशासनाचे कौतुक होत आहे.
सोलापूर रेल्वे विभागाचा वार्षिक आढावा बैठक नुकताच झाला असून, यात रेल्वेच्या विशेष कामकाजावर चर्चा झाली आहे. सुरक्षा मोहिमेने उल्लेखनीय यश मिळविल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली आहे. अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले, रेल्वे सुरक्षा विभागाने एकूण ५८ मुलांचा शोध लावला असून, यात ३६ मुली व २२ मुलांचा समावेश आहे.
या सुरक्षा मोहिमेंतर्गत २३ प्रकरणांत एकूण २३ गुन्हेगारांना पकडले. २३८ प्रकरणांत रेल्वेने अपंग, आजारी, जखमी तसेच वयस्कर प्रवाशांना मदत केली आहे. तीन गर्भवती महिलांना मदत केल्याने त्यांची प्रसूतीदेखील सुखरूप झाली आहे. तसेच ई-तिकीटप्रक्रियेत एजंटगिरी करणाऱ्यांना रेल्वेने रंगेहात पकडले असून, त्यांच्यावर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, यंदा रेल्वेने पंधराशेहून अधिक वृक्ष लावले आहे.