लेकरं घरात राहिली, संकट टळलं; कोरोनाच्या भितीनं मुलं संसर्गापासून दूर राहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:35 PM2021-01-20T12:35:06+5:302021-01-20T12:35:11+5:30
चांगली बातमी; सोलापूर जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण घटले
राजकुमार सारोळे
सोलापूर : कोरोना साथीच्या काळात जिल्ह्यात बालमृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सन २०२० मध्ये २३७ ने बालमृत्यूमध्ये घट झाली आहे. जन्मत: ते १४ वर्षांपर्यंतच्या बालकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे जन्मल्यानंतर ते तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना वेळेत लसीकरण करणे गरजेचे आहे.
० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवर, कावीळ, डायरिया, अतिसार, मेंदूदाह, न्यूमोनिया, मलेरिया, डेंग्यू या आजारांना सामना करावा लागतो. त्यामुळे बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. बालकांच्या लसीकरणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या माध्यमातून अशा बालकांचे सर्वेक्षण करून लसीकरणाचा कार्यक्रम काटेकोरपणे पार पडला जातो. तरीही बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.
साथीच्या आजारापेक्षा जन्मत: व्यंग असलेली बालके याला बळी पडतात. त्यानंतर गोवर, कावीळ, न्यूमोनियामुळे मुले दगावतात, पण मार्च २०२० नंतर कोरोना साथीच्या प्रभावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला व शाळा सुरू नसल्याने साथीच्या आजाराचे प्रसारण थांबले.
मुले घराबाहेर पडली नाहीत तसेच मास्कच्या वापरामुळे आजारी पडण्याचे प्रमाण घटले. यामुळे या काळात बालमृत्यूचे प्रमाणही बरेच खाली आल्याचे आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
न्यूमोनियाचा प्रभाव
न्यूमोनिया, कावीळ, गोवर यामुळे मुले दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचबराेबर जन्मत: व्यंग, कमी वजन, कमी दिवस, ॲशफॅक्सिया,मेंदूदाह यामुळे बालमृत्यू होतात. न्यूमोनिया व गोवर हे संसर्गजन्य आजार आहेत.
मुले घरातच राहिल्याने संसर्ग टळला
काेरोना साथीमुळे मुलांना घरातच राहावे लागले. बाहेर पडताना मास्कचा वापर केल्याने संसर्ग झाला नाही. याशिवाय शाळाच नसल्याने मुले संसर्गापासून दूर राहिली. मास्कच्या वापराने सर्दी, खोकला असे आजार झाले नाहीत.
मास्कचा वापर व मुले घराबाहेर न पडण्यामुळे संसर्ग टळला. अंगणवाडी, शाळा बंद असल्याने मुले एकत्र आली नाहीत हा महत्त्वाचा फॅक्टर ठरला. न्यूमोनिया, गोवर हा अतिसांसर्गिक आहे. मुले घरातच राहिल्याने हा फायदा झाल्याचे दिसत आहे.
- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी.
संसर्ग, डायरिया, न्यूमोनिया या तीन प्रमुख कारणांमुळे बालके मृत्युमुखी पडतात. कोरोनामुळे लहान मुलांसह मोठ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे संसर्गामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले. कावीळ, डेंग्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
- डॉ. अतुल कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ, सोलापूर.