पालकांना चुकवून आलेली मुलं उतरतात जीवघेण्या पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 01:59 PM2019-05-22T13:59:25+5:302019-05-22T14:02:57+5:30
सिद्धेश्वर तलावाच्या घाटावर हटकणारेच कोणी नसल्याने वारंवार घडतात दुर्घटना
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : पोहायला गेलेल्या दोन मुलांचा सिद्धेश्वर तलावात बुडून सोमवारी मृत्यू..झाला़ वाटलं मंगळवारी येथे कोणी नसावा़..या घटनेचा पालकांनी धडा अथवा बोध घेतला असावा पण नाही ! आजही पालकांना चुकवून आलेली मुले तिथेच़..पाण्यात डुंबणं..आरडाओरड करणं..पाण्यात रंगलेला सुरपारंब्याचा खेऴ अगदी कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळेच पालकांना चुकवून आलेली मुलं जीवघेण्या खोल पाण्यात उतरण्याचे धाडस करीत असल्याचे चित्र तलाव परिसरात दिसून आले.
निखिल उगाडे (वय १७) आणि सौरभ सरवदे (वय १६, दोघे रा. रविवार पेठ) अशी सोमवारी सिद्धेश्वर तलावात बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत़ रविवारी दुपारी कडक ऊन होते़ सिद्धेश्वर तलावात पोहण्यासाठी ही दोन मुले सायकलीवरुन आली़ संरक्षण भिंतीजवळ दोघांच्या चपला आणि सायकल मिळून आली़ यावरुन दोन मुले पाण्यात पडल्याचे काही लोकांना लक्षात आले आणि रविवारी दुपारी बुडालेल्या मुलांचा सोमवारी पहाटेपासून अग्निशामक दल पथकाच्या माध्यमातून शोध सुरु झाला. सकाळी या दोघांचा मृतदेह बाहेर काढला गेला. या घटनेनंतर सिद्धेश्वर तलावाभोवतलाचे चित्र काही बदललेले नाही़ ही घटना ना मंदिर समिती, ना संबंधित सुरक्षा यंत्रणेने गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. मंगळवारी सिद्धेश्वर तलावाभोवताली चक्कर मारली असता काठावर पतंग खेळणारी मुले आढळली़ याबरोबरच काही मुले पाण्यात पोहताना तर काही मुले त्यांना पाहत बसलेली दिसून आली़ कालचीच स्थिती आज होती़ काही ठिकाणी पाणी आणि गाळ साचलेला दिसतोय. काही ठिकाणी केवळ पोहण्याइतपत पाणी आहे. या कडक उन्हात काही मुले पालकांची नजर चुकवून, घरात काही न सांगता बाहेर पडतात आणि थेट तलावात डुंबायला बाहेर पडतात.
एक कुंड बंद तर दुसरं उघडं
- संपूर्ण तलाव परिसरात गणपती विसर्जनासाठी दोन कुंड बांधण्यात आले आहेत़ जवळपास २० ते २५ फूट खोलीचे हे दोनही कुंड असून, पठाण बागेकडील कुंड लोखंडी दरवाजाने बंद ठेवले आहे़ त्यामुळे या कुंडाभोवती गर्दी नव्हती़ दुसरे कुंड हे सरस्वती प्रशालेच्या बाजूला असून, ते मोकळे दिसत होते़ या कुंडात गढूळ साचलेले पाणी आणि प्लास्टिक पिशव्या, बाटल्या पडलेल्या आहेत़ या कुंडात कोणी गेला तर कळतही नाही़ कुंडदेखील धोकादायक ठरत आहे़ घाटावर देवाच्या दर्शनासाठी अनेक लोक येतात़ तसेच काही मुलेदेखील देवदर्शनाच्या बहाण्याने घरातून बाहेर पडतात़
अनेकांसाठी वामकुक्षीचे ठिकाण...
- तलावाच्या काठावरील सावलीचे ठिकाण हे शहरातील अनेक लोक दुपारी वामकुक्षीचे ठिकाण करून सोडले आहे़ कायमचे घरातून बाहेर पडलेले आणि त्यांना कुठेच निवासस्थान नाही असेही काही लोक या ठिकाणी आपले वास्तव्य करून सोडले आह़े या लोकांना कोणीच हटकत नाही़ यामुळे या परिसरातून उनाड मुलांनाही मोकळीकता मिळाली आहे़ त्यांनाही कु णी हटकणारे नसल्याने सोमवारी निखिल उगाडे आणि सौरभ सरवदे या दोघांवर मृत्यूचा प्रसंग ओढावला़ येथे घुटमळणाºया लोकांपैकी काही लोक मद्यपी आणि व्यसनाधीनही आहेत़
मंदिर आणि परिसरासाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमले आहेत़ ते कधी कधी तलावाभोवती फिरतात़ त्यांच्या नजरेस ही मुले येत नाहीत़ आता मात्र या तलावाभोवती दुचाकीवर गस्त घालणाबाबत सुरक्षा सरक्षकांना सांगतोय़ अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी आमचा प्रयत्न आहे़
- धर्मराज काडादी
चेअरमन-मंदिर समिती
मंदिर आणि तलाव परिसर मोठा आहे़ त्यावर एक -दोन खासगी सुरक्षा रक्षक तैनात करुन चालणार नाही़ एरव्ही त्यांच्या मदतीला पोलीस आहेत़ परंतु याबाबत महापालिका आणि मंदिर समितीला पत्रव्यवहार करुन सुरक्षा रक्षकांची गस्त वाढवण्याबाबत आवाहन करतोय़ त्यांच्याशी समन्वय ठेवतोय़
- संजय साळुंखे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक.