कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक शुल्कासाठी मिळणार दहा हजार, जूनअखेरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत
By Appasaheb.patil | Published: June 8, 2023 04:00 PM2023-06-08T16:00:45+5:302023-06-08T16:02:52+5:30
या निधीचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील प्रति बालकास शैक्षणिक शुल्क १० हजार रुपये बालकांच्या शैक्षणिक शुल्कासाठी वितरित करण्यात येणार आहे.
सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावाने आई अथवा वडील, दोन्ही पालक गमावलेल्या बालकाच्या शैक्षणिक खर्चासाठी बालनिधी प्राप्त झालेला आहे. या निधीचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील प्रति बालकास शैक्षणिक शुल्क १० हजार रुपये बालकांच्या शैक्षणिक शुल्कासाठी वितरित करण्यात येणार आहे.
दरम्यान, लाभार्थ्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे ३० जून २०२३ पर्यंत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असेही जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने कळविले आहे. अर्थसहाय्य मिळण्याकरिता अर्ज, बालकाचे शाळेचे बोनाफाइड, आई-वडील कोविड पॉझिटिव्ह असल्या-बाबतचा पुरावा, झेरॉक्स प्रत, आई-वडील मृत्यू दाखला झेरॉक्स प्रत, ज्या शाळेत प्रवेश घेतला आहे, त्या शाळेच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत, बालकाचे आधार कार्डची झेरॉक्स प्रत अशी कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहेत. तसेच, शाळेचा फी पडताळणीचा अर्ज लाभार्थींनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून सदर अर्ज शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडून स्वाक्षरी करून कार्यालयात वर नमूद कागदपत्रांसह प्रस्ताव कार्यालयात जमा करावा असेही कळविले आहे. अधिक माहितीसाठी सोलापूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, शोभानगर, सात रस्ता, सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.