चिमुकला नदीत पडला,तरुण धावला;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:24 AM2021-09-21T04:24:27+5:302021-09-21T04:24:27+5:30
दोघांना बुडताना रणरागिनींनी वाचवलं! लोकमत न्यूज नेटवर्क अमर गायकवाड माढा : एकीकडे विघ्नहर्त्या ‘बाप्पा’ला निरोप देण्यासाठी सर्वांची धांदल रू ...
दोघांना बुडताना रणरागिनींनी वाचवलं!
लोकमत न्यूज नेटवर्क अमर गायकवाड
माढा : एकीकडे विघ्नहर्त्या ‘बाप्पा’ला निरोप देण्यासाठी सर्वांची धांदल रू असताना सीना नदीच्या पात्रात खेळायला गेलेल्या चिमुकल्याचा तोल गेला अन् बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी तरुण धावला. मात्र चिमुकल्यानं मिठी मारल्याने दोघे बुडू लागले. याचवेळी दोन रणरागिणींनी प्रसंगावधान राखून उडी मारून त्या दोघांना सुखरूप बाहेर काढले. त्यांच्यामुळे अरिष्ट टळले. राहुलनगर (ता. माढा) येथे रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली.
राधिका राजेंद्र भोई व राणी धोंडिराम भोई (राहुलनगर ) अशी या जीव वाचवणाऱ्या महिलांची नावे आहेत. त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
अनंत चतुर्दशी दिवशी रविवारी सकाळी प्रीतम शिंदे (वय ९) हा मुलगा आपल्या मित्रासह नदीजवळ खेळत असताना तोल जाऊन नदीपात्रात पडला. याठिकाणी असलेल्या लहान मुलांनी प्रीतम पाण्यात पडल्याबद्दल आरडाओरडा केला. यावेळी जवळच असलेल्या दिनकर ओहळ (वय ३६) यांनी मदतीसाठी तत्काळ नदीपात्रात उडी टाकली. मात्र, घाबरलेल्या प्रीतमने दिनकर यांना मिठी मारल्यानंतर दिनकर यांना हात-पाय हलवणे अवघड झाले. तर, दुसरीकडे पाण्याचा वेग देखील जोरात असल्याने दोघांच्या जीवालाही धोका निर्माण झाला. नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या राधिका भोई व राणी भोई यांनी प्रसंगावधान राखून नदीपात्रात उडी टाकली. आठ ते दहा फुटांपर्यंत पाणी असलेल्या ठिकाणी पोहत जाऊन दिनकर यांच्या हातामध्ये राधिकाने साडी दिली व दोघींनी साडी ओढून प्रीतम, दिनकर यांंना आपला जीव धोक्यात घालून सुखरूप बाहेर काढले आहे.
-----
नेहमीप्रमाणे आम्ही नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर वाचविण्यासाठी लहान मुलांनी आरडाओरडा केल्यावर आमच्याच गावातील प्रीतम शिंदे व दिनकर ओहळ हे बुडत असताना दिसले. आम्हालाही पोहता येत असल्याने आम्ही क्षणार्धात कशाचाही विचार न करता त्यांना मदतीसाठी पाण्यात उडी टाकून साडीच्या मदतीने बाहेर काढण्याच्या प्रयत्नाला यश आले.
- राधिका व राणी भुई, राहुल नगर
---
महिलांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी मोठी दुर्घटना टळली. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देण्याचा ठराव ग्रामपंचायतीकडून करण्यात येईल.
- रोहनराज धुमाळ, सरपंच, राहुलनगर
----
त्या विघ्नहर्त्याच्या रूपाने धावून आल्या
राणी व राधिका भोई या धाडसी महिलांनी बाप्पाच्या रूपाने बुडणाऱ्या दोघांनाही वाचवण्यासाठी सीनेच्या पात्रात उडी मारली. त्यांच्यामुळेच दोघांचे प्राण वाचले. बाप्पाच्या विसर्जनासाठी होणारी दुर्घटना टळली.
----
200921\screenshot_20210920-122048_samsung internet.jpg
राधिका भोई व राणी भुई