पंढरपूर, सांगोला, मोहोळ, करमाळ्यात चौरंगी तर अक्कलकोट, बार्शी, शहर उत्तर मतदारसंघात तिरंगी लढत
By appasaheb.patil | Published: October 7, 2019 04:05 PM2019-10-07T16:05:46+5:302019-10-07T16:14:25+5:30
शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पंचरंगी; माढा, माळशिरस, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर, मोहोळ, करमाळा, माढा याठिकाणी बंडखोरी झाली आहे़ पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने अनेक दिग्गजांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत़ त्यामुळे या निवडणुकीत सर्वच ठिकाणी चुरस पहायला मिळणार आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात सुधाकरपंत परिचारक (रयत क्रांती), भारत भालके (राष्ट्रवादी), शिवाजी काळुंगे (काँग्रेस), समाधान आवताडे (अपक्ष) हे चौघे निवडणूक रिंगणात आहेत़ उमेदवारी माघार घेण्याच्या दिवशी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला.
सांगोला विधानसभा मतदारसंघात डॉ़ अनिकेत देशमुख (शेकाप), शहाजीबापू पाटील (शिवसेना), दिपक साळुंखे-पाटील (अपक्ष), राजश्री नागणे (अपक्ष) अशी चौरंगी लढत होणार आहे़ मोहोळ विधानसभा मतदारसंघात नागनाथ क्षीरसागर (शिवसेना), यशवंत माने (राष्ट्रवादी), रमेश कदम (अपक्ष), मनोज शेजवाल (अपक्ष) अशी चौरंगी लढत होणार आहे़ करमाळा मतदारसंघात रश्मी बागल (शिवसेना), संजय पाटील घाटणेकर (राष्ट्रवादी), आमदार नारायण पाटील (अपक्ष), संजय शिंदे (अपक्ष) याठिकाणीही चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ अक्कलकोटमध्ये आमदार सिध्दाराम म्हेत्रे (काँग्रेस), सचिन कल्याणशेट्टी (भाजप) व धर्मराज राठोड (वंचित बहुजन आघाडी) अशी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.
माढयात संजय कोकाटे (शिवसेना), आमदार बबनदादा शिंदे (राष्ट्रवादी) अशी दुरंगी लढत होणार आहे़ सोमवारी उमेदवारी माघार घेण्याच्या दिवशी माढा मतदारसंघातून शिवाजी कांबळे, दादासाहेब साठे, राजाबापू पाटील, नगराध्यक्ष मिनल साठे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला़ माळशिरस मतदारसंघात राम सातपुते (भाजप) व उत्तम जानकर (राष्ट्रवादी) अशी सरळ-सरळ दुरंगी लढत होणार आहे़ बार्शीत आमदार दिलीप सोपल (शिवसेना), माजी आमदार राजेंद्र राऊत (अपक्ष) तर निरंजन भूमकर (राष्ट्रवादी) अशी तिरंगी लढत होणार आहे.
सोलापूर शहरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे (काँग्रेस), माजी आमदार दिलीप माने (शिवसेना), नरसय्या आडम मास्तर (माकप), महेश कोठे (अपक्ष), फारूक शाब्दी अशी पाचरंगी लढत होणार आहे़ दक्षिण मतदारसंघातून सुभाष देशमुख (भाजप), बाबा मिस्त्री (काँग्रेस), उत्तर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे हे असणार आहेत.