सीआयडीसमोर अनेक आव्हाने आहेत, ती पेलण्यासाठी अधिकारी कर्मचाºयांना ताकत देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 07:21 PM2019-07-16T19:21:54+5:302019-07-16T19:25:38+5:30
अतुलचंद्र कुलकर्णी : पुढील कामासंदर्भात लवकरच नियोजन आखणार
सोलापूर : राज्यातील पतसंस्था, बँकांमधील अपहार आदी गुन्हे मोठ्या प्रमाणात आहेत. या गुन्ह्याचा तपास हा सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. ज्या विश्वासाने ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती पेलण्यासाठी सीआयडीच्या अधिकारी व कर्मचाºयांना ताकद दिली जाईल. कामाच्याबाबतीत लवकरच नियोजनाची आखणी करणार असल्याची माहिती सीआयडीचे महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अतुलचंद्र कुलकर्णी हे मंगळवारी सोलापुरच्या दौºयावर आले होते. सीआयडी प्रदेशातील पोलिसांचा तपासणी आणि गुप्त विभाग आहे. या विभागाला हत्या, दंगे, अपहरण, चोरी इत्यादी गुन्ह्यांची तपासणी सोपविली जाते. या एजन्सीला तपास करण्याची जबाबदारी राज्य सरकार किंवा राज्याच्या उच्च न्यायालयातर्फे देण्यात येते. एटीएसमध्ये काम केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सध्या माझ्यावर सीआयडीची जवाबदारी सोपवली आहे. तीस वर्षाच्या सेवेत मला पहिल्यांदा सीआयडीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
ज्याप्रमाणे मी एटीएसमध्ये काम केलं, तशाच पद्धतीने मी सीआयडीमध्ये कर्तव्य पार पाडणार आहे. मी सध्या सीआयडीचा अभ्यास करीत आहे. सीआयडीकडे सोपवण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या तपासाची माहिती घेत आहे. राज्यात पतसंस्था, बँकींग अपहार आदी सारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात आहेत. सर्व गुन्ह्यांचा विचार करून त्याचा तपास पुर्ण कसा करता येईल यावर आपला भर राहणार आहे. ज्या विश्वासाने माझ्यावर जवाबदारी देण्यात आली आहे, ती सार्थपणे पार पाडण्यासाठी मी सखोल अभ्यास करीत आहे. गुन्ह्याचा शोध लागला पाहिजे, लोकांच समाधान झाले पाहिजे. सीआयडीवर लोकांचा जो विश्वास आहे, तो अधिकदृढ करण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. असेही अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ‘लोकमत‘शी बोलताना सांगितले.