कारवाईच्या भीतीने नागरिक फिरकेना, दुकाने उघडूनही व्यवसाय होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:01+5:302021-04-09T04:23:01+5:30
अक्कलकोट : कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घातले. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा व खाद्यपदार्थ वगळता सर्वप्रकारची दुकाने बंद ...
अक्कलकोट : कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घातले. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा व खाद्यपदार्थ वगळता सर्वप्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले, मात्र कारवाईच्या भीतीने नागरिक फिरकत नाहीत. त्यामुळे आमची अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडूनही व्यवसाय होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील लोक पोलीस कारवाई करतील शिवाय सर्व दुकाने बंद असल्याने शहरात येण्याचे टाळत आहेत. एका कामासाठी आल्यानंतर अनेक कामे करून ग्रामीण भागातील नागरिक परततात. परंतु, सध्या अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत, परंतु ग्राहकांअभावी त्यांच्याही व्यवसाय होत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडून काय उपयोग? असा प्रश्न या व्यापाऱ्यांमधून विचारला जात आहे.
कोट:-
अक्कलकोट येथे २५ ते ३० फळविक्रेते आहेत. इतर वेळेला दिवसभर कमी-जास्त ग्राहक असतात. मागील तीन दिवसांपासून शासनाने कडक निर्बंध घातल्याने म्हणावा तसा व्यापार होत नाही. केवळ सकाळी थोडेफार नागरिक येतात. त्यानंतर दुपारी शांतता असते. बाजारपेठ पूर्णपणे सुरू असेल तरच दिवसभर ग्राहक असतात. फळे वेळेवर विक्री होत नसल्याने खराब होऊन आर्थिक नुकसान होत आहेत.
- जलील बागवान, फळविक्रेता
कोट:-
सध्या उन्हाळा आहे. यामुळे खत, बी-बियाणांची विक्री होत नाही. तसेच कोरोनामुळे तालुक्यात सर्वच रस्त्यावर पोलीस कारवाईसाठी तैनात आहेत. यामुळे शेतकरी येण्याचे टाळतात. दुकाने दिवसभर उघडी ठेवली तरी पूर्वीच्या तुलनेत केवळ २५ टक्केच व्यापार होत आहे. यामुळे दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे.
- आप्पासाहेब पाटील
अध्यक्ष, खत बी-बियाणे दुकानदार संघटना
फोटो
०८ अक्कलकोट - दुकान
ओळी
केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी दिली आहे. मात्र, अन्य दुकाने बंद असल्याने फळविक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.