साधा खोकला आला तरीही नागरिक धावताहेत दवाखान्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 10:58 AM2020-03-21T10:58:26+5:302020-03-21T11:04:20+5:30

सोलापूर शहरातील रूग्णांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढली; खबरदारी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

Citizens run to the hospital despite a simple cough | साधा खोकला आला तरीही नागरिक धावताहेत दवाखान्यात

साधा खोकला आला तरीही नागरिक धावताहेत दवाखान्यात

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या आठवडाभरात उपचारासाठी येणाºया रूग्णांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी वाढ शहरात सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढलेले असले तरी डॉक्टरांनी घाबरून न जाण्याचा सोलापूरकरांना सल्ला दिलाफक्त धुळीमध्ये फारसे न फिरता आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा, असे आवाहन केले

दीपक दुपारगुडे

सोलापूर : सोलापूर शहरात विशेषत: गावठाण भागामध्ये ठिकठिकाणी जलवाहिनीच्या कामांमुळे प्रमुख रस्ते खोदलेले आहेत. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. ही धूळ  खोकला आणि सर्दीला निमंत्रण देत असून, हे दोन्ही आजार कोरोना संसर्गाच्या लक्षणांमध्ये येत असल्याने भयभीत होऊन सोलापूरकर दवाखाना गाठत आहेत. गेल्या आठवडाभरात उपचारासाठी येणाºया रूग्णांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी वाढ झाली.

शहरात सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढलेले असले तरी डॉक्टरांनी घाबरून न जाण्याचा सोलापूरकरांना सल्ला दिला असून, फक्त धुळीमध्ये फारसे न फिरता आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे. सर्दी, खोकल्यामुळे आपण कोरोनासंशयित व्यक्तीच्या संपर्कात तरी आलेलो नाहीत ना? अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.  रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना हा त्रास तीव्रतेने जाणवत आहे. साबण, हॅण्डवॉश व पाण्याचा वापर करुन हात सतत स्वच्छ करावेत शिंकताना किंवा खोकताना नाकावर व तोंडावर रुमाल झाकावा. सर्दी किंवा फ्लूसदृश लक्षणे असलेल्यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला व आवश्यक ते उपचार घ्यावेत. मांसाहार किंवा अंडी खाताना त्या शिजलेल्या किंवा उकडलेल्या आहेत, याची खात्री करावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

गेल्या आठवडाभरात अशा रुग्णांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढली आहे. शहरात सध्या कोरोनाचा रूग्ण आढळला नसला तरी कोरोनाच्या धास्तीने फक्त सर्दी-खोकला अशी लक्षणे आढळल्यास नागरिक तपासणीकरिता येत आहेत. लोक भीतीने आम्हाला कोरोनाची लागण तरी झाली नाही ना, अशी विचारपूस करीत आहेत. नागरिकांनी न घाबरता खबरदारी घेणे गरजेचे आहे.
-डॉ. गिरीश हरकुड 
कान, नाक, घसा तज्ज्ञ़

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणे दिसतात. सध्या कोरोनामुळे दररोज चार ते पाच रूग्ण तपासणीसाठी येत आहेत. विशेष म्हणजे शहरात सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. शहरात सगळीकडे तंबाखूमिश्रित धूळ आहे़ कारण शहरात सर्रास तंबाखूजन्य पदार्थ हवेत मिसळलेले आहेत.
 -डॉ.जलील मुजावर 
कान, नाक, घसा तज्ज्ञ़

Web Title: Citizens run to the hospital despite a simple cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.