नागरिकशास्त्राचे धडे थेट ग्रामपंचायतीतून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 10:03 AM2019-08-12T10:03:02+5:302019-08-12T10:05:24+5:30
सिंहगड पब्लिक स्कूलचा उपक्रम; चार भिंतीच्या बाहेर पडून शिक्षण देण्याचा प्रयत्न
सोलापूर : शिक्षण देणे म्हणजे फक्त क्रमिक पुस्तकातील धडे गिरवणे नव्हे तर प्रत्येक अंगाने विद्यार्थ्यांचा विकास करणे हा आहे. याच उद्देशाने सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी थेट अकोलेकाटी येथील ग्रामपंचायतीत येऊन नागरिकशास्त्राचा पाठ शिकविला. विद्यार्थ्यांनीही आवडीने ग्रामपंचायत कशी चालते हे समजून घेतले. ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजाविषयी विद्यार्थ्यांनी प्रश्नही विचारले. इयत्ता सातवीच्या नागरिकशास्त्र या विषयात ग्रामपंचायत हा धडा आहे. चार भिंतीच्या आत शिक्षण देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटी देऊन संकल्पना समजावून घेण्याकडे शाळेचा कल असतो.
इयत्ता पाचवीसाठी विज्ञान विषयात वनस्पतीविषयीचा एक धडा आहे. हा भाग वर्गात शिकविण्याऐेवजी निसर्गाच्या सान्निध्यात शिकविणे अधिक परिणामकारक होईल. हा विचार करुन विद्यार्थ्यांना बाहेर नेण्यात आले. विविध वनस्पतींची माहिती देत, प्रकाश संश्लेषणसारख्या प्रक्रिया स्पष्ट करण्यात आल्या. विज्ञान, पर्यावरण तसेच इतर विषयांचे शिक्षण हे शक्य असेल तिथे थेट भेट देऊन शिकविण्यात येतो. यामुळे विद्यार्थ्यांना एखादा विषय लवकर समजण्यास मदत तर मिळतेच सोबतच एखाद्या विषयाची सखोल माहिती घेण्याची जिज्ञासा वाढते.
मुलांमध्ये भारतीय संस्कृती व परंंपरेची रुजवणूक होण्यासाठी शाळेमध्ये प्रत्येक महापुरुषांची जयंती व स्मृतिदिन, सर्व धर्मातील प्रत्येक सण उत्साहाने, जल्लोषात साजरा करतात़ सकाळी प्रार्थना सभा घेताना त्यादिवसाचे दिनविशेष, मुलांचे वाढदिवस, सुविचार व प्रश्नमंजूषा हे उपक्रम राबविले जातात. तसेच प्रात्यक्षिकावर आधारित अभ्यासाच्या उद्देशाने शाळेतील मुला-मुलींंना सहलीसाठी साखर कारखाना, डाळिंब संशोधन केंद्र, पारले फॅक्टरी, दूध डेअरी, विज्ञान केंद्र या ठिकाणी भेट देऊन तेथील माहिती घेतली जाते. सर्वांगीण विकासाकरिता कराटे, स्केटिंग, नृत्य, गायन, स्काऊट आणि गाईड यासाठी वेगळा वर्ग घेतला जातो.
गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड...
बेळगाव येथे रोलबॉल, स्केटिंग स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ३०९ मुलांनी सहभाग घेतला. २४ तास रोलबॉल, स्केटिंंग करण्याचा विक्रम सिंहगड पब्लिक स्कूलच्या यश शिवाळ या विद्यार्थ्याने केला. त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासातच नाही तर क्षेत्रात प्रगती करावी यासाठी मार्गदर्शन केले जाते. याला पालकांचेही तितकेच सहकार्य असते. मुलांमध्ये असलेल्या अंतरिक अवगत गुणांना ओळखून त्यांना घडविण्याचा प्रयत्न केला जातो.
पालकांप्रमाणेच आम्हीदेखील मुलांच्या आनंदी जीवनासाठी कटिबद्ध आहोत. आम्हाला विश्वास आहे की आमचे विद्यार्थी सिंहगडच्या सुरक्षित,अनुकूल आणि विविधांगी वातावरणात राहून शैक्षणिक त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरती उत्तुंग यश मिळवतील. अल्बर्ट आइन्स्टाइनने सांगितल्याप्रमाणे कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा महत्त्वाची असते. ज्ञान म्हणजे जे सर्व काही तुम्हाला माहीत आहे परंंतु कल्पनाशक्ती म्हणजे तुमची नवनिर्मितीची आणि नवीन गोष्टी शोधून काढण्याची क्षमता. त्याला आकार देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
- सुजेन थॉमस, प्राचार्या, सिंहगड पब्लिक स्कूल.