साेलापुरात विमानसेवेच्या गप्पा, सिटी बस कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी ठिय्या
By राकेश कदम | Published: June 19, 2023 06:04 PM2023-06-19T18:04:44+5:302023-06-19T18:05:12+5:30
महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ५० हून अधिक कामगार साेमवारी सायंकाळी लाल बावटा महानगरपालिका युनियनच्या नेतृत्वाखाली एकत्र आले.
सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर साेलापुरात विमानसेवेच्या गप्पा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे शहरात महापालिकेची परिवहन व्यवस्था माेडकळीस आली आहे. परिवहनच्या सेवानिवृत्त कामगारांनी साेमवारी थकीत वेतनासाठी आंदाेलन केले.
महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ५० हून अधिक कामगार साेमवारी सायंकाळी लाल बावटा महानगरपालिका युनियनच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. काॅम्रेड व्यंकटेश कोंगारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना निवेदन दिले. यावेळी तौफिक शेख, सुरेश बागलकोट, कॉ. अयुब शेख, काँ. सतीश दाभाडे, कॉ. महिबुब शेख, कॉ. अंबादास हुच्चे, कॉ. आसिफ लालकोट आदींचा समावेश होता.
काॅम्रेड काेंगारी म्हणाले, महापालिकेच्या परिवहन विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी प्रचंड ओढाताण करावी लागत आहे. महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२३ पासून सातवा वेतन आयोग लागू करणे आला आहे. सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम हा महानगरपालिकेचा एक विभाग असताना परिवहनः उपकमाकडील अधिकारी, कर्मचा-यांना व सेवानिवृत्त कर्मचा-यांना ७ वा वेतन आयोग लागू करणेत आलेला नाही. ही बाब समस्त परिवहन कर्मचा-यांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे महापालिकेच्या विराेधात माेर्चा काढला आहे.