‘काकां’साठी सिटी... ...‘दादां’साठी झेडपी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:16 AM2021-06-20T04:16:23+5:302021-06-20T04:16:23+5:30
...‘दादां’साठी झेडपी ! अखेर ठरला...‘बारामतीकरां’चा ‘करेक्ट कार्यक्रम’ अखेर ठरलं. ‘बारामतीकरां’चा प्लॅन फिक्स झाला. सोलापूर जिल्ह्यातल्या विरोधकांचा ‘कार्यक्रम करेक्ट’ करण्याचा ...
...‘दादां’साठी झेडपी !
अखेर ठरला...‘बारामतीकरां’चा ‘करेक्ट कार्यक्रम’ अखेर ठरलं. ‘बारामतीकरां’चा प्लॅन फिक्स झाला. सोलापूर जिल्ह्यातल्या विरोधकांचा ‘कार्यक्रम करेक्ट’ करण्याचा मुहूर्त आखला. ‘अकलूज’च्या ‘दादां’चा सूड घ्यायचा, ‘पंढरपूर’च्या ‘पंतां’चा वचपा काढायचा. ‘सोलापूर’च्या दोन्ही ‘देशमुखां’चा बदला घ्यायचा. त्यासाठी ‘थोरल्या काकां’नी ‘महापालिका’ हस्तगत करायची, तर ‘अजितदादां’नी थेट ‘झेडपी’ काबीज करायची. त्यासाठी वाट्टेल तेवढं मोजायची अन् पाहिजे तेवढी माणसं फोडायची तयारीही ठेवलेली..लगाव बत्ती...
‘थोरले काका बारामतीकरां’चे सोलापूर जिल्ह्यावर पूर्वीपासूनच विशेष प्रेम. ते पहिले पालकमंत्री याच सोलापूरचे बनलेले. त्यांच्या प्रत्येक धाडसी वळणावर त्यांना या जिल्ह्यानं नेहमी साथ दिलेली. ‘पुलोद’वेळी ‘सुशीलकुमार’ असोत किंवा ‘घड्याळ’ स्थापनेवेळी ‘विजयदादा’ या नेत्यांनी त्यांच्या विस्मयजनक मोहिमेत उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला. रक्ताळलेल्या पाठीवरचं ‘खंजीर’ बनण्याची भूमिकाही इथल्या मंडळींनी दर्शवलेली. ‘माढा लोकसभे’च्या दुष्काळी माळरानावर जेवढी कुसळं उगविलेली नसतील, त्याहीहून अधिक मताधिक्क्यानं त्यांना निवडून आणताना ‘पीएम’ पदाचं स्वप्न इथल्याच भोळ्या मतदारांनी पाहिलेलं.
जिल्ह्यात पूर्वी दोन गट. ‘झेडपी’समोर गाड्या फक्त ‘अकलूजकरां’च्या दिसतील, तर ‘इंद्रभवन’चा कॉल फक्त ‘जाई-जुई’लाच जाईल, असं ठरलेलं. हे दोन्हीही नेते ‘बारामतीकरां’चे विश्वासू सहकारी; तरीही स्वभावानुसार यांच्यावर विश्वास न ठेवता स्वत:चा स्वतंत्र तिसरा गट जिवंत ठेवण्यात ‘काकां’ना नेहमीच रस. तरीही पूर्वी शहरात ‘सुशीलकुमारां’चाच होल्ड असल्यानं ‘घड्याळ’वाले मेंबर नेहमीच बोटावर मोजण्याइतपत राहिलेले.
मात्र गेल्या पाच-सहा वर्षांत दोन देशमुखांनी ‘शिंदेशाही’ची पाऽऽर वाट लावून टाकली. होत्याचं नव्हतं करून टाकलं. पालिका हातातून गेली. दोन सलग पराभवामुळं ‘सुशीलकुमारां’नीही सोलापूरवरचं लक्ष काढून टाकलं. अशा वादळातही अंधारातल्या वाटेवर ‘प्रणितीताई’ मोठ्या जिद्दीने ‘आमदारकीचा दिवा’ तेवत ठेवून निघालेल्या नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या पक्षाला सावरण्याची त्यांची उर्मी खरोखरच लाजबाब; मात्र ‘ईगो’ अन् ‘रुसवे-फुगवे’च्या माहोलमध्ये कार्यकर्त्यांना पुन्हा जिंकण्याचा आत्मविश्वासच कमावता न आलेला. हे असं का यावर पुढं कधी तरी सविस्तर...‘लगाव बत्ती’...
असो. ‘हात’ कमकुवत झालाय हे लक्षात आलेल्या ‘थोरल्या काकां’नी म्हणूनच शहराच्या राजकारणात आता जाणीवपूर्वक हात टाकलाय. माणसं फोडायला सुरुवात केलीय. ‘दिलीपराव’ अन् ‘महेशअण्णा’ म्हणजे राजकारणाच्या आखाड्यातले तगडे गडी. जणू ‘आत्मघातकी बॉम्ब’च. वेळ पडली तर स्वत:ही फुटतील अन् आजूबाजूचा कॅम्पसही उद्ध्वस्त करतील. याचा दाहक अनुभव ‘हात’वाल्यांनी यापूर्वीही घेतलेला. खरंतर असे कैक ‘बॉम्ब’ आजपावेतो ‘सुशीलकुमारां’नी आपल्या अस्तनीत अत्यंत सावधपणे हाताळलेले. आपले सहकारी मोठे झाले तरच आपलंही ‘मोठेपण’ टिकून राहतं, हे त्यांनी चाणाक्षपणे ओळखलेलं; मात्र त्यांच्या पुढच्या पिढीनं ॲग्रेसिव्ह ‘पॉलिटिकल’च्या नादात या मंडळींना दुखावून ठेवलेलं.
...अन् अशा ‘डिस्टर्ब टीम’ला आपल्या सोबत घेण्याचा एककलमी प्रोग्राम सध्या ‘बारामतीकरां’नी आखलाय. ‘दिलीपराव’ आक्रमक, ‘महेशअण्णा’ चतुर, ‘तौफिकभाई’ बेधडक. यांच्या पाठीमागे जनाधारही दांडगा. विशेष म्हणजे ही सारी मंडळी ‘शिंदे’ घराण्याच्या विरोधात पूर्वी बिनधास्तपणे दंड ठोकून उभारलेली. त्यामुळं ‘बारामतीकरां’चा हा नवा ‘ट्रिपल’ प्रोग्राम नेमका ‘जनवात्सल्य’च्या विरोधात आहे की ‘देशमुख’वाड्याच्या...हे खुद्द ‘घड्याळ’वाल्या कार्यकर्त्यांनाही लक्षात येईनासं झालंय
जाता-जाता !
‘थोरल्या काकां’च्या गुप्त बैठकीतला रिपोर्ट जस्साच्या तस्सा ‘जनवात्सल्य’वर पोहोचविणारे ते ‘दोन खबरे’ कोण याचा शोध घेण्यासाठी ‘मीडिया’नं म्हणे ‘मनोहरपंत’ अन् ‘दिलीपभाऊ’ या दोघांनाही खूप कॉल केले. मात्र त्यांचे मोबाईल सतत एन्गेज. नंतर कळालं की, या खबऱ्यांची खबर नेमकी ‘गादेकरभाऊं’पर्यंत कशी पोहोचली, याचा शोध घेण्यामध्ये हे दोघे दिवसभर व्यस्त...लगाव बत्ती...
‘लक्ष्मीपुत्रां’ची समाजसेवा...
आर्थिक पाठबळाअभावी ज्यांना निवडणूक लढविता येत नाही, अशा प्रामाणिक अन् हुशार कार्यकर्त्यांसाठी पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक असायची. पार्टीचा व्हीप निघाला की काहीही न करता हे सर्वसामान्य उमेदवार निवडून यायचे. आक्रमक आमदार म्हणून अधिवेशन गाजवायचे. मात्र आता परिस्थिती पलटलीय. विधानसभेपेक्षाही जास्त महागडी ही इलेक्शन वाटू लागलीय. सोलापूर जिल्ह्यात अशी ‘प्रोफेशनल सिस्टिम’ सर्वप्रथम आणली ‘सुभाषबापूं’नी. तीच परंपरा पुढं सुरू राहिली.
कर्जबाजारी होऊनही ‘दीपकआबां’सारखे नेते गपगुमान घरी बसू लागले; कारण हा खेळ ‘पेट्यांत’ नव्हे तर ‘खोक्यात’ खेळायचा असतो. हे त्यांच्या ध्यानातच न आलेलं.
असो. यंदा तर दोन ‘लक्ष्मीपुत्र’ एकमेकांच्या विरोधात उभारण्याची शक्यता दाट. एक ‘पंढरपूरचे प्रशांतपंत’ दुसरे ‘कुमठ्याचे दिलीपराव !’ दोघांमध्ये बऱ्याच गोष्टी साम्य. दोघांनाही ‘मालक’ म्हणवून घ्यायला आवडतं; मात्र आपण यांचे ‘चाकर’ नाही हे मतदारांनीच पूर्वी निवडणुकीत दाखवून दिलेलं. दोघांच्याही घरी लक्ष्मी ‘दुधा’च्या बरणीतून पाणी ओतून गेलेली. दोघांकडेही ‘साखरे’च्या पोत्यांच्या थैल्या रचून ठेवलेल्या. दोघांच्याही बँकेत अनेक कुबेर कामाला असलेले. दोघांच्याही शिक्षण संस्थांचं प्रांगण. सरस्वतीसोबतच लक्ष्मीपुत्रांच्याही किलबिलाटानं फुलून गेलेलं. आजकालची ‘कॉलेज’ पोरं ज्या झपाट्यानं मोबाईलचं सीमकार्ड बदलतात, तेवढ्याच वेगात पक्षांची चिन्हं बदलण्याचाही या दोघांनाही छंद.
या दोघांचं.................. भारी. निवडून येण्यासाठी काहीही करण्याची तयारी. त्यामुळंच ‘हे दोघे एकमेकांविरोधात उभारणार’ ही ‘ब्रेकिंग न्यूज’ ‘लोकमत’मधून झळकताच अनेक बँकांच्या मॅनेजरचे धडाधड फोन म्हणे बऱ्याच ‘मेंबरां’ना गेलेले. तेव्हा काही ‘झेडपी मेंबरां’नी ठणकावून सांगितलं की, ‘काळजी करू नका. लवकरच बँकेचे कर्ज एकरकमी फेडू ? काही ‘पालिका मेंबरां’नी विश्वास दिला की, ‘येस...पक्काऽऽ एफडी तुमच्याच बँकेत फिक्स’
सट्टा बाजारातही बुकींनी खर्चाच्या आकड्यावर बोली पुकारली म्हणे. कुणी म्हणालं ‘गेल्या वेळी वीस-पंचवीस खोकी फुटलेली. यंदा पन्नास खोक्यांना मरण नाही. लावा आकडा ? हे ऐकून दचकलेले दोन सामान्य कार्यकर्ते एकमेकांशी कुजबुजले ‘आपल्याला आजपर्यंत पेट्या अन् खोकी माहीत होत्या रेऽऽ आता हा अर्धा ट्रंक ओपन होताना पहिल्यांदाच पाहायला मिळणार गड्याऽऽ ? लगाव बत्ती...