सिव्हिल हॉस्पिटलने विचारला सल्ला; संचालनालयाने मागितला उलट खुलासा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:56 PM2020-09-28T12:56:21+5:302020-09-28T13:10:52+5:30
रोजंदारी कर्मचाºयांचे नियुक्ती प्रकरण: सल्ला मागण्याचे कारणही विचारले
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) वर्ग चारची पदे भरण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या काम करत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांच्या नियुक्तीबाबत सिव्हिल प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला मार्गदर्शन करण्याबाबत विचारणा केली होती. यावर मार्गदर्शन करणे तर दूरच उलट मार्गदर्शन का करायचे याबाबत सिव्हिलनेच खुलासा करावा, असे पत्र संचालनालयाने सिव्हिलला पाठवले आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागात संपूर्ण महाराष्ट्रात वर्ग १ ते वर्ग ४ पर्यंतची संपूर्ण रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार आहेत. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वर्ग चारची १४५ पदे रिक्त आहेत. स्थानिक प्रशासनाने रोजंदारी कर्मचाºयांना रिक्त पदावर सामील घेण्यासंदर्भात १९ जुलै रोजी संचालक यांना मार्गदर्शन मागविले होते. या पत्रात रुग्णालयातील रोजंदारी कर्मचाºयांनी दाखल केलेल्या याचिकेतील अंतरिम आदेशाचा आपण पद भरण्याबाबत विचार करावा, जेणेकरून भविष्यात अडचणी निर्माण होणार नाही असा उल्लेख केला होता.
रोजंदारी कर्मचाºयांना कामावर घेताना शासनाची अथवा संचालनालयाची परवानगी घेण्यात आली होती काय? जर यांना नियुक्ती आदेश दिले असेल तर आता संचालनालयाचे मार्गदर्शन मागविण्याचे प्रयोजन काय? याचा खुलासा तत्काळ संचालनालयास सादर करावा, असे उलट पत्र स्थानिक प्रशासनाला पाठवले आहे.
जीव धोक्यात घालून काम करताना खुलासा का नाही मागितला
मागील १० वर्षांपासून १२० रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. कोविडच्या काळात विम्याचे संरक्षण मिळावे म्हणून स्थानिक प्रशासनाने १२० रोजंदारी कर्मचाºयांची यादी संचालनालयास सादर केली होती. कायम कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे रोजंदारी कर्मचारी कोविड ब्लॉकमध्ये सहा महिन्यापासून जीव धोक्यात घालून विनावेतन रुग्णसेवा देत आहोत. हे सगळे होत असताना खुलासा मागितला नाही मग आत्ताच का खुलासा मागत आहात असा सवाल रोजंदारी कर्मचारी संघटनेने केला आहे.