सोलापुरात बांधकाम क्षेत्रातील मंदीबाबत दावे-प्रतिदावे; मजुरांच्या रोजीरोटीवर गंडांतर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 10:59 AM2019-09-06T10:59:51+5:302019-09-06T11:03:18+5:30
अनेकांच्या हाताला काम नाही : निर्माणाधिन प्रकल्पांची कामे सुरू, ६० टक्के झाले बेरोजगार
रवींद्र देशमुख
सोलापूर : उत्पादन सेवा आणि विक्री क्षेत्रात मंदीचे वातावरण दिसून येत असताना सोलापुरात बांधकाम क्षेत्रातील मंदीबाबत मात्र दावे-प्रतिदावे केले जात आहेत. प्रत्यक्षात मात्र या क्षेत्रातील ६० टक्के मजुरांच्या रोजीरोटीवर संकट आले आहे.
नोटाबंदी, जीएसटी स्थिरस्थावर होणे आणि ‘रेरा’च्या प्रतीक्षेमुळे गेल्या पाच वर्षांपासून शहरात तयार असलेल्या सदनिकांची खरेदी खूपच मंदावली आहे. आता जीएसटीचा दरही एक टक्का इतका कमी केला आहे. शिवाय ‘रेरा’च्या तरतुदीही ज्ञात झाल्या आहेत. या स्थितीतही बांधकाम क्षेत्राला उठाव मिळाला नाही. त्यामुळे मंदीची स्थिती कायम आहे.
प्रमुख बिल्डर्स मात्र या स्थितीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. ‘क्रेडाई’चे राज्य उपाध्यक्ष सुनील फुरडे म्हणाले की, मंदी होती; पण गेल्या चार महिन्यांपासून वातावरण बदलले आहे. लोकांना घरांची गरज आहे. त्यामुळे आधी विचारणा केलेले ग्राहक आता खरेदीसाठी पुढे येत आहेत माझ्याकडे तीन अपार्टमेंटचे बुकिंग सुरू झाले आहे.
राजेंद्र शहा-कांसवा यांना मात्र तसे वाटत नाही. त्यांनी सांगितले, लोक केवळ विचारणा करण्यासाठी येतात, पण प्रत्यक्षात खरेदी होत नाही. जीएसटी लागू झाल्यानंतर बांधकामाचा खर्च प्रति चौरस फूट १५० रुपयांनी वाढला आहे. या स्थितीत आम्ही अगदी स्वस्तात घरे देऊ शकत नाही. ग्राहकांना स्वस्तच घरे हवी आहेत. यामुळे सदनिकांना उठाव मिळत नाही.
समीर गांधी म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून घराच्या किमती स्थिरच आहेत. या स्थितीत खरेदीसाठी उत्तम काळ आहे. शिवाय किफायतशीर घरे देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. केंद्राने अगदी २.६७ लाखांपर्यंत सवलत दिली आहे. याचाही लाभ ग्राहक घेऊ शकतात. सध्या घरांची खरेदी होत आहे. जुळे सोलापुरातील माझ्या एका प्रकल्पाचे ५० टक्के बुकिंग झाले आहे. त्यामुळे मला मंदी वाटत नाही.
मंदीचा परिणाम थेट रोजगारावर होतो याकडे दृष्टिक्षेप टाकला असता बांधकाम क्षेत्रातील मजुरांच्या हाताला काम नाही, सेंट्रिंग कंत्राटदार अनिल बानकर यांनी सांगितले की, नवीन प्रकल्पाच्या कामाची कंत्राटं मिळत नसल्याने सध्या ६० टक्के मजुरांच्या हाताला दररोज काम मिळत नाही. सोलापुरात सेंट्रिंगसह बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक मजुरांची संख्या सुमारे ३०,००० आहे. त्यातील १८००० मजुरांना काम मिळत नाही. किरकोळ नूतनीकरण किंवा डागडुजीच्या कामांवर त्यांना समाधान मानावे लागते.
नियुक्त मजूर नाहीत
- सोलापुरात १५० बिल्डर्स असून, कोणाकडेही स्वत: नियुक्त केलेले मजूर नाहीत. सेंट्रिंग, गिलावा, सुतारकाम, रंगारी, प्लम्बिंग आदी कामांचे कंत्राट दिले जाते. कंत्राटदार मजूर आणतात. एका कंत्राटदाराकडे कायम काम करणे मजुरांसाठी बंधनकारक नसते.
मजुरांची अंदाजे संख्या
- - सेंट्रिंग- १५,०००
- - सुतारकाम - ३०००
- - वायरमन - ४०० ते ५००
- - नळकाम - १०००
- - रंगारी - २०००
- - बिगारी, अन्य सहायकारी कामे - ७०००
- - यातील ६० टक्के मजुरांच्या हातांना सध्या काम नाही.