पाचवीत शिकणारी सोलापूरची अंतरा नरुटे पोहोचली आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वतावर
By Appasaheb.patil | Published: July 20, 2024 05:46 PM2024-07-20T17:46:32+5:302024-07-20T17:46:58+5:30
टांझानियामध्ये असलेला हा ज्वालामुखी पर्वत समुद्रसपाटीपासून १९,३४१ फूट उंच
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: इयत्ता पाचवीत शिकणारी अंतरा नरूटे (वय १०) हिने ही देशपातळीवर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आई-वडिलांशिवाय अंतराने प्रवास करीत आफ्रीकेतील टांझानिया येथील किलीमांजारो या सुप्त ज्वालामुखीच्या पर्वतावर अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती प्रथमच पोहोचविली आहे. सोलापूरच्या रेल्वे लाईनजवळ आजोळ असलेल्या अंतरा नरूटे हिच्या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तांझानिया देशात असलेला हा ज्वालामुखी पर्वत समुद्रसपाटीपासून ५८९५ मीटर (१९३४१ फूट) उंच आहे. या देशाच्या ईशान्य भागात पूर्व गोलार्धात ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेला हा आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत आहे. दरम्यान, अंतराने यापूर्वी गोरक्षनाथ गड, रतनगड, हरिश्चंद्रगड, कोकणकडा, कळसूबाई शिखर येथे यापूर्वी कु.अंतराने ट्रेकिंग केली आहे. याशिवाय तिने योगा, रोप मल्लखांब, सिल्क मल्लखांबचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतले. अंतराने किलीमांजारो पर्वतावरील चढाई किलिमांजारो नॅशनल पार्कपासून रेनफ़ॉरेस्टमधून सुरवात केली. १० किलोमीटरचे घनदाट जंगलातून हे अंतर अंतर कापण्यास ६ तास लागले. त्यानंतर मंडारा हट ते होरंबो हे १० किलोमीटरचे अंतर कापण्यास ९ तास, तर होरंबो ते किबो हे १० किलोमीटरचे अंतर पार करण्यास ८ तास लागले. उणे १० अंश तापमानात किबो हटपासून वर १८ हजार फूट उंच चढाई पूर्ण केल्यानंतर हवेतील बदलचा व कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणामुळे चढाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. अंतरा हिने भारत देशाचा तिरंगा फडकवत, राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती व होमिओपॅथीचे जनक डाॅ.सॅम्युअल हॅनिमन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व आफ्रिकन मार्टीन आणि जस्टीन या स्थानिक गाईडच्या मदतीने अंतराने हे यश मिळवले आहे.