सोलापूरचे शास्त्रीय संगीत वैभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 02:30 PM2019-05-31T14:30:39+5:302019-05-31T14:31:18+5:30
आजही सोलापुरात शात्रीय संगीताला फारसे चांगले दिवस नाहीयेत ,फार कमी प्रमाणात शास्त्रीय संगीत ऐकू येतंय ,‘गायक फार झाले ,सूर ऐकू येईना’ अशी काहीशी परिस्थिती आहे.
सोलापूरच्यासंगीत वैभवाचा सखोल अभ्यास केला तर त्यात शास्त्रीय संगीताला प्राधान्य द्यावे लागेल. साधारण सत्तरीच्या दशकात दिगंबरबुवा कुलकर्णी, रामचंद्र बेंद्रे, दत्तूसिंह गहिरवार, भीमराव कनकधर, प्रभूदेव सरदार, रामाचार्य बागेवाडीकर, चंचला गांधी, डॉ. चौगुले, गोवंडेबुवा, सतारिस्ट पिंपळे, उस्ताद रहिमत खाँ, माझे वडील मधुकर वैद्य, पुरोहित सर, प्रा. जेऊ रकर, वसंतराव जोशी, तबलावादक उमर्र्जीकर, बाळासाहेब बेंद्रे, पंचवाडकर सर, (ते अंध होते), प्रा. सुलभा पिशवीकर, ठकार मॅडम यांची नावं प्रामुख्यानं घेतली जायची. हा सोलापूरच्या शास्त्रीय संगीताचा पाया मानता येईल.
या सर्वांमध्ये पुजारी सरांचं नाव संगीत समीक्षक आणि शास्त्रीय संगीताचे अतिशय जाणकार म्हणून घेता येईल. पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर वसंतराव देशपांडे,आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याशी जवळचा सहवास पुजारी सरांना लाभला होता, स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा गुणधर्म, पण संगीताचा अतिशय चांगला कान त्यांना होता. अगदी भिम्या आणि वश्या म्हणायच्या ताकदीचा हा माणूस होता. पण सोलापूरच्या शास्त्रीय संगीताचा म्हणावा तसा उदय झाला असे दिसत नाही. सगळेच गायक हे चांगले शिक्षक असतातच असे नाही.आपापली नोकरी आणि व्यवसाय करत या सर्वांनी आपली कला जोपासली होती, पण म्हणतात ना ‘कलेवर पोट असणाºया या सर्वात फार कमी व्यक्ती होत्या. दिगंबर बुवा कुलकर्णी ,सतारिस्ट रहिमत खान आणि भीमराव कनकधर ,पंचवाडकर सर, गहिरवार सर, बागेवाडीकर सर यांनी त्यांची कला क्लासच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
नंतरच्या काळात पंडित विठ्ठलराव क्षीरसागर. विठ्ठलरावांनी आजवर अनेक चित्रपटांसाठी सुमधुर ढोलकीची साथ दिली, आहे. संगीत दिग्दर्शक राम कदमांच्या कित्येक गाण्यांना त्यांनी आपली ढोलकी वाजवली आहे. त्यांनी बरेच विद्यार्थी सोलापूरकरांना दिले आहेत. पंडित आनंद बदामीकर, पंडित श्याम कुलकर्णी, दत्ता मास्तर, बाळासाहेब कुलकर्णी, अनिल तोरो, अविनाश गोडबोले, भगवंत कुलकर्णी, वैशंपायन, रोहिणी उपळाईकर, डॉ. रायते कुटुंब अशा अनेक कलाकारांनी सोलापूरची संगीत भूमी गाजवली होती. उपशास्त्रीय गायकीत सोलापूरचे नाव खूप उंचीवर नेऊन ठेवलं ते फैय्याज यांनी. भगवंत कुलकर्णी यांनीसुद्धा मुंबई, पुणे रेडिओवर सोलापूरचा कलाकार म्हणून खूप नावलौकिक मिळवला. पंडित आनंद बदामीकर यांनी तर खूप मोठ्या कलाकारांबरोबर तबल्याची साथ केली आहे.
सवाई गंधर्वसारख्या आणि इतर मोठ्या संगीत संमेलनात त्यांनी हजेरी लावली. प्रभूदेव सरदार जेव्हा निवृत्त होऊन सोलापुरात स्थायिक झाले तेव्हा सोलापूरला थोडी शास्त्रीय संगीताची गोडी लागली होती. श्रीकृष्ण खाडिलकर, शिरीष बोकील, पौर्णिमा ठकार, सुनील काडगावकर ,देशक ,संध्या जोशी या नवीन पिढीतल्या गायकांना प्रभुदेवांचा कृपाप्रसाद थोडा का होईना लाभला होता, परंतु अचानक गोव्याच्या संगीत अकादमीवर प्रभुदेव रुजू झाले आणि परत सोलापूर शास्त्रीय संगीत पारखं झालं. वळसंगकर आणि पिशवीकर मॅडम यांच्या बरोबरीने नंदाताई जोशी, संध्या जोशी,शर्वरी कुलकर्णी यांचे देखील शिष्य तयार होताहेत. अभिषेकी बुवांचे शिष्य कलढोणे हे देखील शिषोत्तम तयार करीत आहेत.आता सोलापुरात ‘गुरू शिष्य’ परंपरेतले अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढेपण गुरू शिल्लक नाहीत. शास्त्रीय संगीताच्या या लेखामध्ये पुरोहित सरांचं नावं घेतलंच पाहिजे,कुठलाही गुरू नसताना सर, व्हायोलिन,सतार,संतूर या सारखी सगळी वाद्यं अगदी लीलया वाजवतात. खरं तर त्यांच्यावर पूर्ण लेख लवकरच मी लिहिणार आहे.
मध्यंतरी एक संगीत जाणकारानं ‘संगीत किंवा गाणं ही एक थॉट प्रोसेस आहे असं सांगितलं होतं’ खरंच आहे पण हल्लीचे गायक ‘गाण्याचा विचार’ फारसा करताना दिसत नाहीत. व्यावसायिक गायक ही नवीन पदवी हल्ली फार रूढ झालेली आहे. मागे एकदा मी पुण्यातल्या एका हार्मोनियम वादकाला ‘तुम्ही कार्यक्रमाचं मानधन किती घेता ? असा प्रश्न विचारला होता ,त्याने तत्काळ उत्तर दिलं होतं ‘ माझं मानधन जास्त नाहीये पण, मी हल्ली मालिनी ताई, प्रभाताई,आरतीताई या बरोबरीच्या लोकांबरोबरच वाजवतो. आज जमाना बदललाय, पण आजही सोलापुरात शात्रीय संगीताला फारसे चांगले दिवस नाहीयेत ,फार कमी प्रमाणात शास्त्रीय संगीत ऐकू येतंय ,‘गायक फार झाले ,सूर ऐकू येईना’ अशी काहीशी परिस्थिती आहे.
- सतीश वैद्य
(लेखक संगीत क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)