बाराशे मावळ्यांकडून सोलापुरातील भुईकोट किल्ल्याची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 11:24 AM2020-03-02T11:24:13+5:302020-03-02T11:28:49+5:30

चार टन कचरा केला गोळा; भुईकोटची झालेली दुरवस्था चर्चेचा विषय ठरला 

Cleaning of Bhuikot fort in Solapur by 1200 Mawals | बाराशे मावळ्यांकडून सोलापुरातील भुईकोट किल्ल्याची स्वच्छता

बाराशे मावळ्यांकडून सोलापुरातील भुईकोट किल्ल्याची स्वच्छता

googlenewsNext
ठळक मुद्दे२७ जिल्ह्यातील तब्बल एक हजारांहून अधिक मावळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभरातील अनेक गडकिल्ले स्वच्छता राजा शिवछत्रपती परिवाराच्या नेतृत्वाखाली रविवारी भुईकोट किल्ला परिसरात दुसºयांदा स्वच्छता मोहीम झालीभुईकोट किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबवताना राजा शिवछत्रपती परिवारातील मावळ्यांना जमिनीखाली तीन दगडी तोफगोळे सापडले़

सोलापूर : भुईकोट किल्ल्याची दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. रविवारी सकाळी भुईकोट आवारात मोठी स्वच्छता मोहीम झाली. या मोहिमेत देशी-विदेशी दारूच्या, बीअरच्याही बाटल्या सापडल्याची माहिती स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतलेल्या सोलापूरकरांनी दिली़ यासोबत दहा पोती इतक्या प्लास्टिकच्या बाटल्या सापडल्याची माहिती पुढे आली आहे.  तब्बल ४ टन कचरा मोहिमेतून हटवण्यात आला़ एकीकडे मनपाकडून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत भुईकोट किल्ल्याचा विकास करण्याचे प्रयत्न सुरु आहेत़ अशात किल्ल्यात दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या सापडल्याने पुन्हा एकदा भुईकोटची झालेली दुरवस्था चर्चेचा विषय ठरला आहे.

 एकच ध्यास़ग़डकोट विकास या आवाहनाला राज्यभरातील बाराशेहून अधिक गडप्रेमींनी प्रतिसाद देत सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात आयोजित स्वच्छता मोहिमेत स्वयंस्फूर्तीने श्रमदान केले़ राजा शिवछत्रपती परिवाराच्या नेतृत्वाखाली राज्यभर गडकिल्ले स्वच्छता मोहीम सुरु आहे़ परिवाराच्या पुढाकारातून रविवारी सकाळी एक हजाराहून अधिक शिवप्रेमी मावळ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला़ आज सकाळी साडेसात वाजता स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली़ सहा तासांहून अधिक वेळ मावळ्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले़ यातून तब्बल ४ टन कचरा किल्ल्यातून हटवला आहे़ कचरा, प्लास्टिक बाटल्यांनी किल्ल्याचा श्वास गुदमरत होता़ आजच्या स्वच्छता मोहिमेतून किल्ल्याने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे़ किल्ला स्वच्छ आणि साफ झाला आहे.

आजच्या स्वच्छता मोहिमेत दोनशेहून अधिक सोलापूरकरांनीही सहभाग घेतला आहे़ यात शाळकरी मुले, महाविद्यालयीन युवक, युवतींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला़ सर्व मावळ्यांनी भगवा कुर्ता आणि भगवे टी शर्ट घालून जय जिजाऊ़़जय शिवरायच्या उत्साही घोषणा दिल्या़ सकाळी साडेसात वाजता राजा शिवछत्रपती परिवाराकडून ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्रोच्चार झाला़ त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन झाले़ आठ दरम्यान सर्वांनी श्रमदान करायला सुरुवात केली़ नऊनंतर स्वच्छता मोहिमेत गर्दी वाढू लागली़ जो तो स्वयंस्फूर्तीने यात सहभागी होत होता़ श्रमदान करणाºयांना सोलापूरकरांनी चहा, नाष्टा आणि पाण्याची सोय केली़ सहा तासात तब्बल ४ टन कचरा गोळा झाला.

यावेळी परिवाराचे संस्थापक  माजी सैनिक सुनील सूर्यवंशी, अध्यक्ष आशिष घोरपडे,सल्लागार अली महम्मद, संपर्कप्रमुख डॉ़ बबनराव सोनवणे, व्यवस्थापक लक्ष्मण भोसले, सोलापूर विभागप्रमुख सूरज पाटील, बालाजी वाघ, जलकन्या भक्ती जाधव, विश्वनाथ शिंदे, विकास पाटील, श्रीनिवास गायकवाड, समाधान वाघ आणि तृप्ती शिरामे यांच्यासह हजारो मावळे उपस्थित होते.

महापालिकेचे सहकार्य
- महापालिकेकडून दोन कचरा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली़ तसेच मनपाकडून मावळ्यासाठी मोबाईल टॉयलेट आणि सांडपाणी टँकरची सोय करण्यात आली़ स्वच्छता झाल्यानंतर किल्ला आवारात पाण्याचा शिडकावा करण्यात आला़ दुपारी एकपर्यंत स्वच्छता मोहीम सुरु होती़ मोहिमेपूर्वी मावळ्यांनी सकाळी मराठा मंदिरपासून प्रभात फेरी काढली़ या फेरीतून गडकिल्ले वाचवण्याची हाक देण्यात आली़ स्वच्छ किल्ले़़ स्वच्छ राज्य असा मेसेज प्रभात फेरीतून देण्यात आला़

मराठा मंदिरात झाला निरोप समारंभ
- २७ जिल्ह्यातील तब्बल एक हजारांहून अधिक मावळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभरातील अनेक गडकिल्ले स्वच्छता करण्यात व्यस्त आहेत. राजा शिवछत्रपती परिवाराच्या नेतृत्वाखाली रविवारी भुईकोट किल्ला परिसरात दुसºयांदा स्वच्छता मोहीम झाली आहे़ सर्व मावळे शनिवारी सायंकाळी येथील मराठा मंदिरात मुक्कामी होते़  सोलापूरकरांनी गहू, तांदूळ, साखर, भाकरी तसेच इतर साहित्य देऊन त्यांची सेवा केली़ स्वच्छता मोहिमेनंतर रविवारी दुपारी दोन वाजता मराठा मंदिरात मावळ्यांकरिता निरोप समारंभ झाला़ सर्वांनी सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याबद्दल मनोगत व्यक्त केले़ मोहिमेत सहभाग घेऊन  आनंद वाटल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली़ यावेळी काही मावळे भावूक झाले़

भुईकोट किल्ल्यात सापडले दगडी तोफगोळे
भुईकोट किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबवताना राजा शिवछत्रपती परिवारातील मावळ्यांना जमिनीखाली तीन दगडी तोफगोळे सापडले़ दगडी तोफगोळे सापडल्यानंतर परिवारातील सदस्यांनी पुरातत्त्व विभागाला कळवले़ त्यानंतर दगडी तोफगोळे पुरातत्त्व विभागाच्या महादेव कांबळे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती राजा शिवछत्रपती परिवाराचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सूरज पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली़ याबाबत पुरातत्त्व विभागाचे स्मारक परिचर महादेव कांबळे यांना विचारले असता त्यांनी दगडी तोफगोळे जमा करून घेतल्याचे सांगितले़ याबाबत वरिष्ठांना माहिती दिली असून ते सोमवारी सकाळी तोफगोळ्यांची पाहणी करतील़ 

Web Title: Cleaning of Bhuikot fort in Solapur by 1200 Mawals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.