टेंभुर्णीत महादेव मंदिराचा कळसारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:25 AM2021-07-14T04:25:34+5:302021-07-14T04:25:34+5:30
टेंभुर्णी : लोकवर्गणीतून ७५ लाख रुपये खर्चून टेंभुर्णीत उभारलेल्या शिवकालीन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराचा कळसारोहण ...
टेंभुर्णी : लोकवर्गणीतून ७५ लाख रुपये खर्चून टेंभुर्णीत उभारलेल्या शिवकालीन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराचा कळसारोहण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष संजय कोकाटे यांनी पुढाकार घेतला होता.
टेंभुर्णी शहरात इतिहासकालीन महादेवाची १२ मंदिरे आहेत. यापैकी औंढा नागनाथच्या धर्तीवर असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर रविवारी कळसारोहण झाला. यावेळी पुणे येथील शिंदवणेचे सरपंच अण्णासाहेब महाडिक, शेतकरी नेते अतुल खुपसे-पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे उपस्थित होते.
मूळ गाभाऱ्याला हात न लावता अभियंता प्रकाश कन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली बाह्य मंदिराचे दाक्षिणात्य पद्धतीने सुशोभीकरण केले. शनिवार व रविवारी या दोन दिवसांत होम-हवन, पूजा करून कलश स्थापन केले. त्यासाठी आळंदीचे ब्रह्मचार्य आले होते. यावेळी नागेश बोबडे, विनोद पाटील, प्रशांत नवले, सुनील आळंदे यांच्या हस्ते पूजा झाली. टेंभुर्णी येथील पेंटर सुनील आळंदे यांनी मंदिराच्या रंगरंगोटीसाठी अडीच लाख इतका खर्च केला आहे. या महादेव मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी संजय कोकाटे यांची निवड केली आहे. तसेच उपाध्यक्ष सुधीर महाडिक-देशमुख, सचिव संतोष तांबे, सदस्य नागेश बोबडे, वसंत येवले-पाटील, शशिकांत देशमुख, यशवंत हांडे, परमेश्वर खरात, महावीर धोका, बारवे यांची निवड करण्यात आली आहे.
--------
फोटो : १२ टेंभुर्णी
टेंभुर्णीत महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारप्रसंगी संजय कोकाटे, सुधीर महाडिक, नागेश बोबडे, वसंत येवले-पाटील.