बार्शीत तूर हमीभाव खरेदी केंद्र बंद, शेतकरी संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:31 AM2018-03-15T11:31:40+5:302018-03-15T11:31:40+5:30
बार्शी शहरतील सर्वच गोदामे झाले पॅक, तूर ठेवायला जागा नाही; १२५० शेतकºयांच्या तूर खरेदीचा प्रश्न
शहाजी फुरडे-पाटील
बार्शी : गोदाम पॅक झाल्याने येथील शासकीय तूर खरेदी केंद्र गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने १२५० शेतकºयांच्या तूर खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील तूर हमीभाव केंद्रात आतापर्यंत २४० शेतकºयांची २५२९ क्ंिवटल तूर खरेदी केल्यानंतर आता यापुढील तूर ठेवण्यासाठी गोदामात जागाच नाही.
केंद्र व राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत राज्यात नाफेडच्या मदतीने हमीभाव खरेदी केंद्रे सुरु केली़ मात्र ती खरेदी केंद्रेदेखील बहुतांश शेतकºयांनी बाजारात कमी भावाने तूर विक्री केल्यानंतर सुरु केली आहेत़ बार्शीत १२ फेब्रुवारी २०१८ रोजी तूर हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले. हे केंद्र केवळ १५ दिवसच सुरु राहिले. या केंद्रासाठी सुमारे १५०० शेतकºयांनी आॅनलाईन पद्धतीने खरेदीची नोंदणी केली. नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी ३३५ शेतकºयांना तूर विक्रीसाठी आणण्याचा मेसेज पाठविण्यात आला. त्यापैकी २४० शेतकºयांची ५ हजार ५८ कट्टे तूर खरेदी झाली. आता गोदामात जागा नसल्याची अडचण पुढे येत आहे.
त्यामुळे खरेदी केलेली तूर कुठे ठेवायची, हा प्रश्न केंद्रास पडला आहे. बाजार समितीच्या वतीने तहसीलदार व वखार महामंडळाकडे याबाबत लेखी मागणी करुन गोडावून उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे़ तरीदेखील गोडावून उपलब्ध करुन दिलेले नाही़ ही तूर सोलापूर किंवा इतरत्र बाहेर घेऊन जाणे हे वाहतुकीच्या दृष्टीने परवडत नाही़
अद्याप शेतकºयांनाही पेमेंट नाही
खरेदी केंद्रावर खरेदी केलेला माल वेअरहाऊसला जाऊन त्यांनी नाफेडला कळविल्याशिवाय शेतकºयांना पेमेंटदेखील काढता येत नाही़ खरेदी केलेला माल तसाच पडून असल्यामुळे अद्याप एकाही शेतकºयाला पैसे दिलेले नाहीत़ एकीकडे शासन खरेदीचा वेग वाढवा असे म्हणत आहे तर दुसरीकडे माल ठेवण्यासाठी गोडावूनची उपलब्धता करुन दिली जात नाही़
प्रशासकासह राजकीय नेत्यांचे लक्ष नाही
- बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती आहे़ प्रशासक असलेले बालाजी कटकधोंड हे आठवड्यातून एक-दोनदा तेही सायंकाळच्या दरम्यान बाजारात येतात. त्यामुळे त्यांचेही बाजारात काय सुरु आहे, याकडे अजिबात लक्ष नाही़ तसेच बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या कोणत्याच पक्षाच्या नेत्यालादेखील खरेदी केंद्रावर काय सुरु आहे याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही़
संथगतीने काम सुरु
- बार्शीच्या केंद्रावर दोन चाळणी यंत्रे आहेत़ याचा विचार केला तर साधारणपणे दररोज एक हजार क्विंटल तूर खरेदी होणे अपेक्षित आहे़ केंद्रावर संथगतीने काम सुरु असून, असेच काम राहिले तर नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर खरेदी करायला चार महिन्यांचा कालावधी लागेल आणि इतके दिवस शासन खरेदी केंद्र सुरु करणार आहे का? हा मोठा प्रश्न आहे़
पणन मंत्र्यांनी लक्ष घालावे
- राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख हेदेखील याच जिल्ह्यातील आहेत. आता त्यांनीच या प्रकरणी लक्ष घालून वेगाने तूर खरेदी होण्यासाठी बार्शीच्या केंद्रावर खरेदी होत असलेली तूर ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध करुन देण्याकामी लक्ष घालावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत़
खरेदी केंद्रावरील तूर ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध करुन द्यावे अशा मागणीचे पत्र आम्ही एक महिन्यापूर्वी तहसील कार्यालयाकडे दिले आहे़ तसेच जिल्हा पुरवठा अधिकाºयांशीदेखील बोलणे झाले आहे़ आम्ही आमच्या गोदामातील धान्याची वारफेर करुन आणखी दोन हजार कट्ट्यासाठी जागा तयार केली आहे़
-सुहास घोडके,
साठा अधीक्षक वखार महामंडळ, बार्शी