बंद दुकाने अर्धवट उघडून, पूजा करून पुन्हा केले शटर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:20 AM2021-04-15T04:20:58+5:302021-04-15T04:20:58+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षी नवनवीन संकल्प करून अनेक लघु व्यावसायिक आपल्या व्यवसायातून नावीन्यपूर्ण गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपडताना दिसत ...
साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षी नवनवीन संकल्प करून अनेक लघु व्यावसायिक आपल्या व्यवसायातून नावीन्यपूर्ण गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपडताना दिसत होते. मात्र, यावर्षी सलग दुसऱ्यांदा संचारबंदी घोषित झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून गिऱ्हाईकांअभावी व प्रतिबंधक उपाययोजनांसाठी अनेक दुकाने बंद स्थितीत होती. मात्र, मुहूर्तासाठी ही दुकाने अर्धवट उघडली व दुकानदारांनी पूजा-अर्चा करून झाल्यानंतर पोलिसांच्या भीतीने पुन्हा दुकाने बंद करून टाकली.
आर्थिक चक्रव्यूह
सध्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी अनेक दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे या दुकानदारांनी गुंतवणूक केलेला लाखो रुपयांचा माल पडून आहे. याशिवाय दुकानांचे भाडे, बँकेचे हप्ते भरल्याशिवाय गत्यंतर नाही. विविध कंपन्यांकडून घेतलेल्या मालाचे पैसे थकले आहेत. कोरोनामुळे ढासळलेल्या अर्थकारणात यामुळे ग्राहक संख्या रोडावत आहे. त्यामुळे एकूणच कोरोना महामारीच्या तडाख्यात लघु व्यावसायिक आर्थिक चक्रव्यूहात अडकत चालले आहेत.
सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीत जीवितहानीबरोबर लघु व्यावसायिकांची लाखो रुपयांची आर्थिक हानी होत आहे. एकीकडे व्यवसायांना खीळ बसत असली तरी दुसऱ्या बाजूला आवश्यक असणाऱ्या खर्चाचा आलेख वाढत चालला आहे. त्यामुळे व्यावसायिक पुरता हतबल झाला आहे.
- रविराज वाणी
फोटोग्राफी दुकानदार
फोटो :::::::::::::::::::::
माळशिरस शहरात बंद असणाऱ्या दुकानांचे अर्धवट शटर उघडून, पूजन करून पुन्हा बंद करत असताना दुकानदार.