आयुक्तांच्या समर्थनार्थ आज बंद
By admin | Published: May 7, 2014 12:24 AM2014-05-07T00:24:52+5:302014-05-07T00:39:55+5:30
भाजप, सेना, माकप, बसपा, मनसे आदींचा सहभाग : पाच ठिकाणांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे
सोलापूर: महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या समर्थनासाठी तसेच सत्ताधारी पक्षाचा निषेध नोंदविण्यासाठी विरोधकांनी बुधवारी सोलापूर बंद पुकारला आहे़ भाजपचे आ़ विजयकुमार देशमुख तसेच माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांच्यासह विविध पक्षांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन बंदची घोषणा केली़ शहरातील पाच विविध ठिकाणांवरून बुधवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चे काढण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाण्याचे निमित्त करुन सोमवारी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले़‘पाणी द्या पाणी द्या, नाहीतर खुर्ची खाली करा’ अशा घोषणा दिल्या़ त्यामुळे अपमानित झालेल्या गुडेवार यांनी तडकाफडकी पदभार सोडून शासनाकडे बदलीची मागणी केली होती़ यामुळे मंगळवारी सोलापूर विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाले़ मनपा कामगारांनी एकत्र येऊन बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता; मात्र सकाळी एक तास आंदोलन झाल्यावर जनतेला वेठीस धरु नये म्हणून हे आंदोलन स्थगित करण्यात आले़ सायंकाळी मनपा प्रवेशद्वारावर माकप आणि बसपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली़ पूर्व भागातील दत्तनगर, एस.टी. स्टँड, कन्ना चौक, रेल्वे स्टेशन येथून हे मोर्चे निघणार आहेत. गुडेवारांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत़ शहराला २०० बस मंजूर केल्या आहेत, कर्मचार्यांना नियमित वेतन सुरू झाले आहे. पाण्याचा प्रश्न गेल्या दहा वर्षांपासून आहे, तो सोडविण्यासाठी त्यांनी १६७ कोटींची योजना शासनाकडून मंजूर करुन घेत आहेत़ सत्ताधारी पक्षामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून पाण्याचे निमित्त असले तरी दुकानदारी बंद झाल्यामुळे आयुक्तांच्या विरोधात सत्ताधारी नगरसेवक आहेत, असा आरोप आडम मास्तर यांनी केला़ बुधवारी होणार्या बंदमध्ये शहरातील सर्व गुडेवारप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले़ या पत्रकार परिषदेला प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे, अशोक निंबर्गी, नरेंद्र काळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)